राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत भाजप-शिंदे गटात असलेल्या वादावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नगर परिषदेच्या प्रचारांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने आल्याने महायुतीमध्ये तणाव असल्याची चर्चा सुरू होती. तर, भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जात होता. विशेषत: भाजप आणि शिवसेना शिंदे गटात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून तणाव निर्माण झाला होता. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महापालिकांमध्ये परस्पर पक्षातून इनकमिंग सुरू झाले होते. तर, पक्ष फोडाफोडी सुरू असताना शिंदे गट-भाजपच्या नेत्यांमध्ये वार प्रतिवार सुरू होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुती की स्वबळ याची चर्चा रंगली होती.
advertisement
दोन्ही नेत्यांतील चर्चेनंतर मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढेल, असा अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर या पारंपरिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणीही महायुतीने एकत्र येत लढण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.
पुढील काही दिवसांत जागावाटप आणि उमेदवार निवडीच्या चर्चांनाही वेग येणार असल्याची माहिती आहे. भाजप-शिंदे गट एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे.
