शिवसेनेतील दोन गटांमधील राजकीय कुरघोडी या बॅनरबाजीमुळे आणखीच चिघळणार आहे. मंगळवारी रात्री उशिराच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाने मातोश्री आणि कलानगर परिसरात आक्रमक बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये ठाकरे गटावर थेट हल्ला चढवण्यात आला असून, मराठी भाषेबाबत "दुटप्पी भूमिका घेतली" असा आरोप करण्यात आला आहे.
बॅनरवरील मजकूर अत्यंत तिखट आणि टोलेबाज स्वरूपाचा आहे. "सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उबाठानेच केला मराठीचा घात..." अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नेतृत्वावर निशाणा साधण्यात आला आहे. "त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय?" अशी विचारणा करत शिंदे गटाने ठाकरे गटाच्या भूतकाळातील भूमिकाही चव्हाट्यावर आणली आहे.
advertisement
शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मराठीच्या मुद्यावर ठाकरे गटाविरोधात आक्रमक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बॅनरबाजी होऊ लागल्याने राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
ठाकरेंकडून विजयी मेळाव्याची हाक...
जीआर रद्द झाल्यानंतर आता 5 जुलै रोजीचा मोर्चा आता विजयी मेळावा म्हणून आयोजित करण्यात येणार आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने या विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीदेखील भाषणे होणार आहेत. राजकीय व्यासपीठावर दोन्ही ठाकरे हे जवळपास 20 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.