नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काही जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे दिसून आले. सांगोल्यातही तसेच चित्र दिसले. सांगोल्यात शिंदे गटाचे नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आघाडी केली आहे. सांगोला नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र आणलं. भाजपनेच कोंडी केल्याने शहाजी बापू पाटील चांगलेच नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी व्यक्त देखील केली होती.
advertisement
प्रचार सभेनंतर छापेमारीची कारवाई...
सांगोल्यात रविवारचा दिवस साधत शिंदे गटाची मोठी सभा पार पडली. या सभेनंतर शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्याशिवाय, त्यांच्या निकटवर्तीयांवरही छापेमारीची कारवाई झाल्याचे वृत्त आहे. छापेमारीत काय सापडलं, काही जप्त करण्यात आले का, याची माहिती समोर आली नाही. सत्तेत असूनही कारवाई झाल्याने शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्तें चांगलेच नाराज झाले आहेत. निवडणुकीत लक्ष्य करण्यात आल्याने शहाजीबापू आधीच नाराज आहेत. अशातच आता छापेमारीच्या कारवाईने त्यांच्या नाराजीत आणखीच वाढ होण्याची भीती आहे.
