राज्याच्या राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अचानक मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याने सत्तेत तणाव वाढल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.
मंत्रीमंडळ बैठकीपूर्वीच शिवसेना गटातील मंत्र्यांनी अचानक नाराजी व्यक्त करत बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे सर्व मंत्री थेट मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपात सुरू असलेले पक्षप्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील जागावाटप आणि स्थानिक नेतृत्वाला थेट पक्षात घेणे आदी मुद्द्यांवरून शिवसेना मंत्र्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा शह दिला जात आहे. शिंदे गटातील नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यासोबतच भाजपकडून शिंदे गटाला आव्हान देणाऱ्या नेत्यांनाही पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यावरून शिंदे गटात मोठी नाराजी असल्याची दिसून येत आहे.
advertisement
प्री-कॅबिनेट बैठकीसाठी मंत्री हजर...
कॅबिनेट बैठकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्री-कॅबिनेट बैठकीसाठी हजर होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिंदे गटाचे मंत्री अनुपस्थित होते. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, आजच्या बहिष्कारानंतर ही धुसफूस चव्हाट्यावर आली असल्याचे दिसून आले.
भाजपातील इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता
अलीकडेच ठाणे, कल्याण, अंबरनाथसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि नेता भाजपात प्रवेश करत आहेत. यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. विशेष म्हणजे,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना भाजपकडून सुरू असलेला आक्रमक पक्षविस्तार हा शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली जाते.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याशिवाय, राज्यातील काही ठिकाणी भाजपने शिंदे गटावरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले.
