रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. रायगडसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. अदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली. पण, शिवसेनेच्या विरोधानंतर ही नियुक्ती मागे घेण्यात आली. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पाच्या मुद्यावर रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी अदिती तटकरे यांनी हजेरी लावली होती. तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे रायगडमधील भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे आमदार अनुपस्थित राहिले.
advertisement
बैठकीची माहितीच नाही?
रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सध्या वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. तर, तटकरे यांनीदेखील पलटवार केला. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले आग्रही आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीबाबत आपल्याला काहीहीच माहिती नसल्याचा दावा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला. बैठक ठरलेली असेल तर त्यांनी आधी आम्हाला निमंत्रण दिलं पाहिजे, तसं काहीच झालं नाही. जिल्ह्याची आढावा बैठक असेल तर आम्हाला तिथं बोलवलं पाहिजे. आम्हाला या बैठकीबद्दल काही माहिती नव्हती. आम्हाला पालकमंत्री पदापासून मी दूर ठेवलेला आहे, त्यामुळे असे निर्णय घेणे योग्य नसल्याचे महेंद्र दळवी यांनी म्हटले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांना बैठकीची कल्पना देण्यात आली होती. त्याशिवाय आमंत्रितही करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
एकनाथ शिंदेंची कोंडी?
प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुतीमध्ये सगळंच काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी सुरू असल्याच्याही चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या काही योजनांना ब्रेक लागणार असल्याचे वृत्त आहे.
