शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुतीत सत्तेत एकत्र असला तरी दोन्ही पक्षात अंतर्गत कुरबुरी मोठ्या प्रमाणावर आहेत. स्थानिक पातळीवरही पदाधिकारी युती करण्यास फारसे उत्सुक नसल्याने भाजपने नाशिकमध्ये स्वबळाची तयारी केली आहे. त्यामुळे एकनाश शिंदे यांनाही स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय उरला नसल्याने रविवारी अमित शाहांचा शिर्डी दौरा आटपून ते नाशिककडे कूच करतील.
advertisement
हॉटेल डेमोक्रसीच्या मेळाव्यात स्वबळाचा नारा
एकनाथ शिंदे रविवारी नाशिकमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करून महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अप्रत्यक्षपणे नारळ फोडतील, असे बोलले जाते. आज सायंकाळी सात वाजता हॉटेल डेमोक्रसी येथे शिंदे शिवसेनेच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद आजमावून पाहतील.
भाजपच्या सर्वशक्तिमान यंत्रणेसमोर शिंदे लढणार
नाशिक आणि मालेगाव महापालिकेसह जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांत सत्ताधाऱ्यांमध्येच मोठी चुरस असेल. भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. एकनाथ शिंदे देखील विशेष रणनीती आखून भाजपला मात देण्याचा कसोशीने प्रयत्न करतील. हेमंत गोडसे, दादा भुसे यांच्या प्रमुख नेतृत्वात शिंदे नाशिक आणि मालेगावची महापालिका निवडणूक लढवतील. भाजपच्या सर्वशक्तिमान यंत्रणेसमोर शिंदे कशी लढत देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नाशिकसाठी भाजपचे १०० पारचे लक्ष्य
राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीत सर्व ताकदीनिशी लढण्याचे भाजपचे धोरण आहे. निवडणुकीसाठी कायम बाह्या सरसावून तयार असलेल्या भाजपने नाशिकमध्ये १०० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने भाजपने अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली आहे, त्याचाच भाग म्हणून सुधाकर बडगुजर यांच्या सारख्या वादग्रस्त नेत्यांना पक्षाने प्रवेश दिला.