श्रीक्षेत्र आळंदी येथील भक्तनिवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला रविंद्र धंगेकर जाणार की नाही, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र दुपारच्या सुमारास धंगेकर यांनी हेलिपॅडजवळच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
एकनाथ शिंदे हसत हसत म्हणाले, त्यांना योग्य सूचना दिल्या आहेत
advertisement
रविंद्र धंगेकर हा काम करणारा कार्यकर्ता आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. त्याचवेळी महायुतीत दंगा नको, अशा सूचना दिल्याचेही हसत हसत शिंदे यांनी सांगितले. त्यावर तुमच्या सूचनेनंतरही मोहोळ यांच्याविरोधात धंगेकर यांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर त्यांना सूचना दिल्या आहेत, अशी सारवासारव शिंदे यांनी केली. एकंदर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांच्या आवाजाला शिंदे धार लावत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.
मोहोळ यांची जैन मुनींशी चर्चा, व्यवहार रद्द होण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द
जैन बोर्डिंगच्या भूमी विक्रीसंदर्भात मंत्री मोहोळ यांचे नाव आल्यानंतर आणि विविध आरोप झाल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतर म्हणजेच शनिवारी त्यांनी बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुनींची भेट घेतली. त्यासाठी जैन धर्मातील प्रतिष्ठित व्यक्तींचे फोन येऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. जैन धर्मियांच्या मागणीशी सहमत आहे. जर या प्रकरणात माझी काही चूक असती तर मी इथे आलो नसतो असे सांगून माझी बाजू मांडण्याकरिता इथे आलो नाही, असे सांगायला देखील मोहोळ विसरले नाहीत.
