सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे शहरातील भाजपा नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतची युती वाचविण्यासाठी रविंद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे. धंगेकर यांच्यावर लवकरच कारवाई होईल, अशी माहिती कळते आहे.
एकनाथ शिंदे यांनी समज देऊनही धंगेकरांची गाडी सुस्साट होती
महायुतीमध्ये दंगा नको, असे एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना पुण्यात जाहीरपणे सांगितले होते तरीही धंगेकरांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करणे थांबवले नाही. धंगेकर हे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाठवलेला हस्तक असून उद्धव सेनेचे संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत. धंगेकरांचा धोका ध्यानात आल्यानंतर त्यांच्याबद्दलचे एकनाथ शिंदे यांचे मत बदलले आहे, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
advertisement
संभाव्य कारवाईची कुणकुण लागताच धंगेकरांचे ट्विट
दुसरीकडे रविंद्र धंगेकरांना संभाव्य कारवाईची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी सर्वप्रथम पुणेकर, मग नंतर पक्ष, युती असे ट्वीट केले आहे. आपल्यावरील कारवाईची पर्वा नसल्याचे सांगताना पुणेकरांचे विषय आपण हिरहिरीने मांडू, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.
युतीधर्म किंवा आघाडीधर्म पाळण्याअगोदर सर्वात अगोदर पुणेकरधर्म पाळणार
दीपावली पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! पाडव्याचा दिवस हा नवसंकल्पाचा दिवस असतो त्यादिवशी माझी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की, समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त व्हा.
खरा कार्यकर्ता तोच असतो, जो समजते चांगलं वाईट ओळखून त्यावर व्यक्त होतो आणि ते घडण्यापासून आपल्या शहराला वाचवतो. आज आपण सर्वजण जे काही आहोत ते ह्या शहरातील लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे त्यामुळे युतीधर्म किंवा आघाडीधर्म पाळण्याअगोदर सर्वात अगोदर पुणेकरधर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात...? सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, मग नंतर पक्ष, युती - आघाडी, गट-तट हे सर्व.... असे ट्विट रविंद्र धंगेकर यांनी केले आहे.