निवडणूक कार्यक्रमात बदल?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा बदलाचे संकेत दिसत आहेत. ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आरक्षण पुनर्रचनेच्या कारणास्तव लांबणीवर जाण्याची शक्यता अधिक झाली आहे. काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० पेक्षा जास्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने ज्या ठिकाणी आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे, त्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आरक्षण नव्याने ठरविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र चंद्रपूर आणि नागपूर महापालिकांच्या निवडणुकांना न्यायालयाने कोणताही आक्षेप नोंदवला नाही. या दोनच महापालिकांचे आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले आहे.
advertisement
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तत्काळ घेणे कठीण होत असल्याचे निवडणूक आयोगाचे मत आहे. आरक्षण पुनर्रचनेला लागणारा कालावधी पाहता या निवडणुकांना विलंब होण्याची शक्यता अधिक आहे. उलट २९ महापालिका निवडणुका कोणत्याही मोठ्या कायदेशीर अडथळ्याविना घेता येऊ शकतील, अशी भूमिका आयोगाने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार सध्यातरी फक्त १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेता येणे शक्य आहे. यामुळे आयोगाचा कल महानगरपालिका निवडणुका आधी घेण्याकडे झुकलेला दिसत असल्याचे म्हटले जात आहे.
महापालिका निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार?
दरम्यान, या निवडणुकांपूर्वी महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. येत्या गुरुवारी (ता. ४) राज्यातील २९ महापालिकांच्या आयुक्तांसोबत निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे होणाऱ्या या बैठकीत महापालिकांची निवडणूक तयारी, मतदार यादीची स्थिती आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. आयोगातील सूत्रांच्या माहितीनुसार, १५ ते २० डिसेंबरदरम्यान महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
मतदार याद्यांवरील शेवटचा टप्पा
महापालिकांच्या मतदार याद्या तयार झाल्या असून १० डिसेंबर रोजी त्यांना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. अंतिम याद्यांवर आक्षेप नोंदविण्यात आल्यास त्यावरील सुधारणा प्रक्रियेमुळे निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसांचा विलंब संभवतो. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
