धाराशिव जिल्हाच्या गावागावात दिसणारं हे चित्र. मराठवाड्यातल्या या भागावर पावसानं कधीच कृपा बरसवली नाही. पण यंदा पाऊस असा काही बरसला की संकंट आणि समस्यांचा डोंगर उभा राहिलाय. चांदणी नदीला आलेल्या महापूराने धाराशिवच्या सिरसाव गावात हाहाकार माजलाय. घरात पाणी.. शेतात पाणी आणि ग्रामस्थांच्या डोळ्यातही पाणी अशी अवस्था आहे. घरातलं साहित्य पावसाने कुजवलंय,अन्नधान्य पावसाने वाहून नेलंय आणि इतकंच नाही तर घरातल्या मुलांची वह्या-पुस्तकही पावसाच्या माऱ्यापासून वाचली नाहीत. त्यामुळे आता करायचं काय असा भलामोठा प्रश्न या गावकऱ्यासमोर आहे.
advertisement
धाराशिवमधल्या परिस्थीतीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन परांडा तालुक्यात पोहोचले. इथे शेतीच्या झालेल्या नुकसानाची माहिती देताना एका शेतकरी बांधवाला रडू फुटलं. एकीकडे परांड्यात शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला तर दुसरीकडे भूम तालुक्यातल्या चिंचपूर ढगे गावात गिरिष महाजनांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पावसामुळे मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडलीये. मांजरा नदीच्या पाण्याचा फटका कळंब शहरासह अनेक गावांनाही बसतोय.
परांडा तालुक्यातल्या चांदणी धरणातून पूर्ण क्षमतेने विसर्ग सुरु झालाय. धरणाच्या पाण्यानं आसपासचा सगळा परिसर वेढलाय. या विसर्गाची दृष्यं अंगावर काटा आणणारी आहेत. धाराशिवचे आमदार आणि खासदार दोघेही या संकटात ऑन फिल्ड उतरलेत. खासदार ओमराजे निंबाळकरांनी सोमवारी रात्री वडनेर मध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. तर खोंदला गावातल्या बचावकार्याच्यावेळी आमदार कैलास पाटीलही रात्रभर उपस्थित होते.
मराठवाड्यावर पावसामुळे कोसळलेलं संकट मोठं आहे. दुष्काळ पाचवीला पुजलेल्या मराठवाड्यात पावसाच्या प्रत्येक थेंबाला सोन्याचं मोल असतं. पण सध्या हाच पाऊस मराठवाड्यातल्या सोन्यासारख्या लोकांची आयुष्यं मातीमोल करुन गेलाय..