वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो, मात्र पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील एका घटनेने या विश्वासाला तडा गेला आहे. 6 वर्षीय शाहू दंदाडे या चिमुरड्याच्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी उजव्या आणि डाव्या हातातील फरकच विसरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलाच्या उजव्या हाताचे अतिरिक्त बोट दुखत असल्याने ते काढणे अपेक्षित होते, मात्र डॉक्टरांनी चक्क डाव्या हाताचे बोट शस्त्रक्रिया करून काढून टाकले. या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला असून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
शाहू दंदाडे याला जन्मतः दोन्ही हातांना सहा-सहा बोटे होती. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या उजव्या हाताच्या सहाव्या बोटात असह्य वेदना होत होत्या. त्यावर उपचार करण्यासाठी पालकांनी त्याला पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर जेव्हा पालकांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या हाताचे बोट दुखत होते ते तसेच होते आणि दुसऱ्याच हाताचे बोट डॉक्टरांनी कापून काढले होते.
कागदपत्रात फेरफार केल्याचा संशय
नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार आपली चूक लपवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने उपचारांच्या कागदपत्रांवरही फेरफार केला आहे. सुरुवातीला उजव्या हाताचा उल्लेख असलेल्या पेपरवर नंतर खाडाखोड करून डावा हात करण्यात आल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
चौकशी करण्यासाठी समिती नेमली
हे प्रकरण बाहेर येताच उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, चौकशीअंती जे डॉक्टर किंवा कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आश्वासन रुग्णालय अधीक्षकांनी दिले आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
