मळसिद्ध कोकळगी यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले असून सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीने ऊस आणि मका पिकांची लागवड करत होते. मात्र उसाचे बिल वेळेवर न मिळणे, तसेच मक्यावर होणारे रोग आणि दरातील चढ-उतार यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातून मार्गदर्शन घेतले आणि फुले मधुरा या हुरड्याच्या वाणाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
पहिल्याच वर्षी या पिकाने त्यांना चांगला प्रतिसाद दिला. लागवडीसाठी एकरी सुमारे 25 ते 30 हजार रुपये खर्च आला. चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत खर्च वजा करून त्यांना एकरी सुमारे एक लाख रुपयांचा नफा मिळाला. त्यांनी तयार केलेला हुरडा सुमारे 400 रुपये प्रति किलो दराने विकला गेला.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते सातत्याने तीन एकर क्षेत्रात फुले मधुरा हुरड्याची लागवड करत आहेत. सध्या एकरी खर्च वजा करून त्यांना चार ते पाच महिन्यांत एकूण तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळत आहे. पारंपरिक पिकांऐवजी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आधुनिक वाणांची निवड केल्यास शेतीत निश्चितच चांगला नफा मिळू शकतो, असा संदेश शेतकरी मळसिद्ध कोकळगी यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.





