बचत गटाच्या कर्जाचे ५० हजार रुपयेही नष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, चावलखेडे येथील शोभाबाई दिलीप अहिरे या गेल्या ३० ते ४० वर्षांपासून माहेरीच राहून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्या लाकूड आणि पाचटांनी बांधलेल्या झोपडीत राहत होत्या. रविवारी (७ डिसेंबर) या झोपडीला अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.
advertisement
या अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य, धान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शोभाबाईंना नुकतंच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळालं होतं. या कर्जातील पन्नास हजार रुपये त्यांनी आपल्या घरात ठेवले होते. पण आगीमुळे या सगळ्या नोटा जळाल्या आहेत.
या दुर्घटनेत शोभाबाई यांचं डोक्यावरील छत नष्ट झालं आहे. कडाक्याच्या थंडीत निवाऱ्याचे साधन गमावल्यामुळे त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या विधवा महिलेला या गंभीर संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने आणि सामाजिक संस्थांनी तातडीने आर्थिक मदत व निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
