मुरूड तालुक्यातील सर्वे येथील रहिवासी असलेले सुरज सारंगे यांच्यासाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा होता. त्यांना काही दिवसांपूर्वीच जुळी मुले झाली होती आणि ती दोन्ही बाळे शुक्रवारीच हॉस्पिटलमधून घरी आली होती. आपल्या चिमुकल्यांच्या स्वागताचा आनंद सुरज यांनी सोशल मीडियावर 'स्टेटस' ठेवून व्यक्त केला होता. मात्र, रात्री कामावरून घरी परतताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
advertisement
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, रेवस-रेड्डी मार्गावर सध्या रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. येथे एका मोरीसाठी मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. रात्रीच्या अंधारात सुरज यांची दुचाकी या खड्ड्यात कोसळली. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा, बॅरिकेट्स, रेडियम पट्ट्या किंवा सूचना फलक लावलेले नव्हते. अंधारात हा खड्डा न दिसल्याने सुरज यांचा तोल गेला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दोषींवर कडक कारवाईची मागणी
या घटनेनंतर महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कंत्राटदाराच्या आणि संबंधित प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळेच सारंगे यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणामुळे हिरावला गेला आहे, अशा शब्दांत संघटनेने रोष व्यक्त करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
वडिलांचे छत्र हरपल्याने हळहळ
सुरज सारंगे हे अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून परिचित होते. ज्या हातांनी जुळ्या लेकांना खेळवायचे होते, त्याच लेकांच्या आगमनानंतर काही तासांतच वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
