भिवंडी : राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या असून महापौरनिवडीची प्रक्रियाही पार पडली आहे. नवनिर्वाचित महापौर कामालाही लागले आहे. पण, भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांना एक कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यामुळे भिवंडीत महापौर निवडणुकीच्या राजकीय नाट्याला कलाटणी मिळाली आहे.
advertisement
एखाद्या राजकीय सिनेमाला लाजवेल अशी घटना भिवंडीमध्ये घडली आहे. भिवंडी महापौरपदाची निवड दोन दिवसांवर असताना एका पक्षाच्या नेत्याला आणि माजी महापौरांना नाट्यमयरित्या अटक झाली. शुक्रवारी रात्री माजी महापौर विलास पाटील यांना पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विलास पाटील यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. आता दोन दिवस सुट्टी असल्यामुळे विलास पाटील यांना कोर्टात धावही घेता येईना. आता पाटलांच्या अटकेनंतर भिवंडी पालिका महापौरपदाच्या निवडणुकीच्या राजकीय नाट्याला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भिवंडीत बंद
विलास पाटील हे भिवंडी महानगरपालिका राजकारणात नेहमी 'किंगमेकर'च्या भूमिकेत राहिले आहेत. आता सुद्धा त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटासोबत जवळीक वाढलेली असून सदस्यांची जमवाजमव सुरू केली होती. विलास पाटील यांच्या अटकेच्या बातमीनंतर भिवंडीत शिवसेना शिंदे गटाकडून भादवड टेमघर नवीबस्ती या परिसरात नगरसेवक बाळाराम चौधरी, रोहित चौधरी यांनी रस्त्यावर उतरून दुकानं बंद करण्यास सुरुवात केली होती.
किंगमेकर विलास पाटलांना अटक का?
2025 मध्ये निजामपूर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री विलास पाटील यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात विलास पाटील यांचा कोणताही संबंध नाही. दाखल गुन्ह्यात सुद्धा त्यांचं नाव समाविष्ट नसताना हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असून यामध्ये विलास पाटील यांना नाहक गोवण्यात आला असल्याचा आरोप विलास पाटील यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी केला आहे. यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे. दरम्यान, भिवंडी महानगरपालिका महापौर पदाच्या निवडीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मुभा मिळावी असा अर्ज सुद्धा न्यायालयासमोर केल्याची माहिती अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे.
भिवंडी महापालिकेत एकूण 90 नगरसेवक आहे. तर बहुमतासाठी 46 चा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. पण, निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. एकीकडे भिवंडीत काँग्रेस हा ३० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजप हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. विलास पाटील यांनी शिंदे गटासोबत चर्चा सुरू केली होती. जुळवाजुळवा ही केली होती. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे, भिवंडीत केवळ 4 नगरसेवक असणाऱ्या कोणार्क विकास आघाडीने आतापर्यंत तब्बल 4 वेळा महापौरपद भूषविले आहे. त्यामुळे विकास पाटलांच्या अटकेमुळे आता भिवंडीत सोमवारी महापौरपदाच्या निवडीच्या वेळी काय घडतं हे पाहण्याचं ठरणार आहे.
भिवंडीतील पक्षीय बलाबल
काँग्रेस- 30
भाजपा -22
शिवसेना - 12
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार - 12
समाजवादी पार्टी - 6
कोणार्क विकास आघाडी- 4 (सोबत 1 अपक्ष घेत गट स्थापन 5)
भिवंडी विकास आघाडी - 3
अपक्ष 1 (कोणार्क विकास आघाडी सोबत सहभागी होत गट स्थापन केला आहे.)
