मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला गावित या आपल्या नातवाला फिरवत रस्त्याच्याकडेने जात होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या मागून धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की त्या रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना मदतीसाठी उचलून प्राथमिक उपचार दिले आणि रुग्णवाहिकेद्वारे नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
advertisement
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निर्मला गावित यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, अपघाताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाहन चालकाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित वाहन चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
