सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस कर्मचारी आकाश भोसले, अर्जुन तिघाडे आणि निवृत्ती बोळके अशी चार आरोपींची नावं आहेत. चारही जणांविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठ्या पदावरील पोलीस अधिकाऱ्याला अशाप्रकारे रंगेहाथ अटक केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराला सहआरोपी न करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराकडे लगेच एवढी मोठी रक्कम नसल्याने, त्यांनी स्वतःकडील १० तोळ्यांचे सोन्याचे हातातील कडे काढून पोलिसांना दिले होते.
advertisement
लाचखोर पोलिसांनी कडं स्वत:कडे ठेवून घेत, ५ लाख रुपये आणण्यास सांगितलं. धक्कादायक म्हणजे, त्यांनी तक्रारदाराच्या भावाकडून परस्पर ४ लाख रुपये घेतले होते. तरीही, संशयितांनी तक्रारदाराकडे पुन्हा ५ लाखांची लाच मागितली. या सततच्या त्रासामुळे तक्रारदाराने अखेर ६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील अँटी करप्शन ब्युरोमध्ये तक्रार दिली होती.
ऊसात दबा धरून बसलं होतं एसीबीचं पथक
कारवाईसाठी भातांगळी येथील शेताची निवड करण्यात आली होती. शेतात ऊस असल्याने परिसर निर्जन होता आणि कारवाईचा धोका कमी होता. मात्र, त्याच उसाच्या शेतात एसीबीचे पथक दबा धरून बसले होते.
तक्रारदाराकडून पैसे घेण्यासाठी पोलीस कर्मचारी अर्जुन तिघाडे एकटाच आला होता. त्याने २ लाख रुपये स्वीकारताच, तक्रारदाराने 'मोजून घ्या' असे सांगितले. हाच कारवाईचा कोडवर्ड होता. सिग्नल मिळताच एसीबीच्या पथकाने अर्जुन तिघाडेला जागीच पकडले. तर सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे आणि इतर दोन कर्मचारी आकाश भोसले, निवृत्ती बोळके यांना लोहारा पोलिस ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले.
पथकाने संशयितांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे रोख रक्कम आणि त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. एसीबीच्या पथकाने ६, ७ आणि १० नोव्हेंबर रोजी या लाच मागणीची पडताळणी केली होती, त्यानंतर ही यशस्वी कारवाई पार पडली.
