आशा संतोष किरंगा असं मृत पावलेल्या २४ वर्षीय मातेचं नाव आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या आलदंडी टोला गावातील रहिवासी आहे. आशा ही नऊ महिन्यांची गर्भवती होती. कोणत्याही क्षणी बाळाला जन्म द्यावा लागेल, याची माहिती त्यांना होती. पण गावात प्रसूती सुविधा नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आपल्या बहिणीच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून प्रसूती वेदना सुरू झाल्या तर लवकर वैद्यकीय सुविधा मिळू शकेल.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मयत आशा किरंगा यांचं आलदंडी हे गाव तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात प्रसूती सुविधा नाहीयेत. त्यामुळे अचानक इमर्जन्सी आली तर तातडीने दवाखाना जवळ करता यावा, आशा यांनी आपल्या बहिणीच्या घरी तोडसाजवळील पेठा गावात जाण्याचा निर्णय घेतला. एक जानेवारी रोजी त्या आपला पती संतोष याच्यासोबत जंगलातील मार्गाने सहा किमी पायपीट करत पेठा गावात पोहोचल्या.
२ जानेवारीला मध्यरात्री त्यांना प्रसववेदना सुरु झाल्या. पेठा गावातील आशासेविकेने रुग्णवाहिकेतून हेडरी येथील दवाखान्यात तातडीने भरती केले. मात्र, बाळ पोटातच दगावल्याचे आढळले. त्यानंतर, आशा किरंगा यांचा रक्तदाब वाढला. यातून त्यांना सावरता आलं नाही आणि यातच त्यांचाही मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी बाळ आणि मातेचे शव हेडरी येथून एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पण तिथे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने पुढे ४० कि.मी. वरील अहेरीला पाठवावे लागले. अहेरी ग्रामीण रुग्णालयात २ जानेवारी रोजी दुपारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांना सोपवला.
