आरोपी गणेश चव्हाणच्या अटकेनंतर त्याने लिफ्ट मागणाऱ्या व्यक्तीला नेमकं कसं मारलं? याचा घटनाक्रम समोर आला आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण याने त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्याला ड्रायव्हिंग सीटवर सीटबेल्ट लावून बसवलं होतं. यानंतर त्याने सीटवर काडीपेटीतील काड्या टाकल्या आणि कार पेटवून दिली. एवढंच नव्हे तर कार पूर्णतः पेटावी, म्हणून त्याने कारच्या पेट्रोल टाकीचं झाकणही उघडं ठेवलं.
advertisement
या जळीत कांडानंतर तो घटनास्थळापासून तुळजापूर मोडपर्यंत पायी गेला. तेथून त्याने खासगी बसने कोल्हापूर गाठलं. पुढे तो एसटीने विजयदुर्गकडे गेला. पण अवघ्या २४ तासात पोलिसांनी त्याला कोकणातून अटक केली. हत्येचा बनाव खरा वाटावा म्हणून आरोपीनं आपल्या हातातील कडं मृतदेहाजवळ टाकलं होतं. यामुळे संबंधित मृतदेह गणेशचाच असल्याची पुष्टी कुटुंबीयांनी केली होती. पोलीसही काही काळासाठी फसले होते.
मात्र या घटनेनंतर जेव्हा पोलिसांनी गणेशच्या मोबाईलचा शोध घेतला. तेव्हा त्याचे दोन्ही फोन बंद असल्याचं दिसून आलं. यानंतर पोलिसांनी गणेश कुणासोबत जास्त संपर्कात होता, याची माहिती मिळवली. तेव्हा तो एका महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जेव्हा संबंधित महिलेकडं चौकशी केली. तेव्हा आरोपी गणेश हा तिसऱ्या नंबरवरून या महिलेच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. त्यानुसार, पोलिसांनी गणेशच्या लोकेशन्सचा शोध घेतला आणि २४ तासात त्याला बेड्या ठोकल्या.
तीन वर्षांपूर्वी काढलेल्या विम्याच्या पैशातून फ्लॅटचं कर्ज फेडण्यासाठी ही हत्या केल्याची कबुली गणेशनं दिली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तसेच तो ज्या महिलेच्या संपर्कात होता, तिचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? तिला या घटनेबद्दल आधीपासून माहीत होतं का? ती गणेशची मैत्रीण आहे की प्रेयसी? याचा सविस्तर तपास लातूर पोलीस करत आहेत.
