अमन शेख, अरबाज पटेल आणि इतर दोन अल्पवयीन आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात काय सांगितले?
गणेश काळे याच्या हत्येमागे आंदेकर टोळीचे कनेक्शन आहे. आरोपींनी एकूण ९ राऊंड फायर केले आहेत. हे कृत्य करायला कोणी सहकार्य केले, कटात कोणकोण सहभागी आहेत, पिस्तूल कोयते कुठून आणले, याचा तपास करायचा असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली.
advertisement
सरकारी वकील काय म्हणाले?
आरोपींनी एकूण नऊ गोळ्या झाडल्या, पोलिसांना दोन बंदुका सापडल्या. केवळ गोळ्या झाडल्या नाही तर कोयत्याने देखील त्यांना मारले. तो जगलाच नाही पाहिजे अशा हेतूने त्याला मारण्यात आले. गुन्ह्यात कोणी वाहन दिले, कोणी पैसे दिले याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केली.
आरोपीच्या वकिलांचा बचावात्मक युक्तिवाद
दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी बचावात्मक युक्तिवाद करताना गुन्हा दाखल झालेले आमचे तीन आरोपी आधीच जेलमध्ये असतानाही त्यांचा या गुन्ह्याशी संबंध लावला जात असल्याचे सांगत पोलिसांना वेगळाच सिनेमा करायचा आहे, असा आरोप केला.
वापरण्यात आलेले 2 पिस्टल मिळाले आहेत. आमचे तीन आरोपी आधीच जेलमध्ये आहेत. या आरोपींना जुन्या गुन्ह्यात घ्यायचे आणि त्यांना या गुन्ह्यात आरोपी करायचे असा सिनेमा पोलिसांनी तयार केलाय. ज्याला मारण्यात आले त्याचा भाऊ वनराज आंदेकर हत्येत सहभागी होता. म्हणून त्या गुन्हाचा आणि या गुन्ह्याचा काय संबंध आहे? असा सवाल करीत पोलीस कोठडीची गरज काय? असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. सगळे आरोपी एकाच भागात राहतात. वाहन शोधण्यासाठी दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली तर हरकत नाही, असेही आरोपीचे वकील म्हणाले.
