मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई अशा विविध जिल्ह्यातील कोकणवासिय गणेशोत्सवात कोकणातील आपल्या गावी जातात. मात्र, बहुतांशी कोकणवासिय हे एसटी पर्याय निवडतात. अनेकजण एकाच गावातील अथवा जवळच्या गावातील असल्याने ग्रुप बुकिंग करत एसटी बस आरक्षित करतात. मात्र, आता हे बस आरक्षण महागणार आहे.
भाविकांवरील आर्थिक बोजा वाढला...
गणपती आणि पंढरपूर वारीसाठी मोठ्या प्रमाणावर एसटी ग्रुप बुकिंग होतं. एकाच ठिकाणाहून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांसाठी एकावेळी एसटी आरक्षित केली जाते. पण महामंडळाने आता या प्रवासासाठी मूळ भाड्याच्या 30 टक्के अधिक आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
advertisement
एसटीची दरवाढ का?
एकेरी प्रवासासाठी आरक्षित केलेल्या बस या परतीच्या मार्गावर बहुतेकवेळा रिकाम्या जातात. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या भरपाईसाठी ही वाढ केल्याचा दावा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लांब पल्ल्याच्या (150 किमी अंतरापेक्षा अधिक अंतरावरील) आगाऊ आरक्षणावर 15 टक्के सूट जाहीर केली होती. त्यानंतर आता ग्रुप बुकिंगच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे कोकणवासियांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
वारकऱ्यांनाही बसणार भुर्दंड
फक्त गणेशभक्तच नव्हे, तर पंढरपूर वारीला जाणारे भाविकही या नव्या दरवाढीच्या फटक्यापासून सुटणार नाहीत. वारीच्या काळात हजारो भाविक एसटी ग्रुप बुकिंग करतात आणि त्यांनाही आता ही 30 टक्के वाढीची झळ बसणार आहे.
दरवाढ मागे घेण्याची मागणी...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशी अचानक भाडेवाढ केल्यामुळे सामान्य कुटुंबाच्या बजेटवर मोठा परिणाम होतो आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.
