भंडारा: भंडाऱ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यात धारदार शस्त्रानं दोघांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे. मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यामध्ये दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरू होती आणि त्यातूनचं आज दोघांवर धारदार शस्त्रानं हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भंडाऱ्यात रात्रीच्या सुमारास घडली. वसीम उर्फ टिंकू खान (३५) आणि शशांक गजभिये (३०) असं दोन्ही मृतकांचं नावं आहे. हल्ला करणारे हे तीन ते चार च्या संख्येत होते. मृत टिंकू खान हे त्यांच्या मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयात बसलेले होते. त्यावेळी हल्लेखोर तिथे आले आणि वसीम खान आणि शशांक गजभियेशी बोलत होते. मात्र, वाद विकोपाला गेला आणि काही कळायच्या हात या टोळक्याने धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळले. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
advertisement
टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यात वाद चालू होता. यातूनच ही हत्या घडल्याचं बोलल्या जातं आहे. तर घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृत देह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून भंडारा पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.