मात्र सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवू लागल्याने केंद्र सरकारने 12 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रासाठी 3,744 किलोलीटर (सुमारे 37.44 लाख लिटर) केरोसिनचा कोटा मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला आहे.
केरोसिन वाटपाचा तपशील
राज्याला मंजूर करण्यात आलेल्या 3,744 KL केरोसिनचे वितरण नियोजित पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
advertisement
प्राधान्यक्रमाने कोणाला मिळणार लाभ?
रॉकेल वितरणात अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिकाधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. यानंतर उपलब्धतेनुसार श्वेत पत्रिकाधारकांनाही रॉकेल मिळू शकते. तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटुंबांनाही ग्रामपंचायतीच्या रहिवासी दाखल्याच्या आधारे रॉकेल दिले जाणार आहे.
स्थलांतरित मजूरांनाही केंद्र किंवा राज्य सरकारच्या ओळखपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ मिळणार आहे.
वितरणाचा कालावधी
हे रॉकेल वितरण मार्च 2026 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाटप सुरू झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत संपूर्ण साठा उचलणे बंधनकारक राहणार आहे.
निर्धारित कालावधीत न उचललेले रॉकेल पुढे हस्तांतरित (carry forward) केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तात्पुरता उपाय म्हणून निर्णय
एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय तात्पुरता उपाय म्हणून घेण्यात आला असून, नागरिकांना स्वयंपाकासाठी पर्यायी इंधन उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
