'मी शंकराचा अवतार, तू माझ्यासोबत...', अशोक खरातने अल्पवयीन मुलालाही सोडलं नाही, नवी विकृती समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी खरात याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. त्याच्याविरोधात आता नववा गुन्हा दाखल झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी खरात याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. आरोपी खरातचे अनेक महिला आणि तरुणींसोबतचे व्हिडीओ आधीच व्हायरल झाले आहेत. आता एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर खरातने अशाप्रकारे अत्याचार केल्याचं समोर आल्याने त्याच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पीडित अल्पवयीन मुलगी मुळची अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी ती अशोक खरातच्या संपर्कात आली होती. आरोपी अशोक खरात याने "माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी शंकराचा अवतार आहे" असं सांगत मुलीला आपल्या जाळ्यात ओढळलं होतं. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी तन-मन-शांतीसाठी विशिष्ट पूजा करावी लागेल, असं खरातने मुलीला सांगितलं होतं.
advertisement
मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर अशोक खरातने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची तक्रार स्वत: अल्पवयीन मुलीनं सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. बुधवारी रात्री उशिरा पीडितेनं ही तक्रार दिली. एका अल्पवयीन मुलीनं आता समोर येऊन अशोक खरातचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने अशाप्रकारे इतरही अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत अघोरी कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
advertisement
२४ मार्चला आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी वकिलाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्याने किमान पाच नरबळी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. अशोक खरातच्या फार्महाऊसवर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथे पोलिसांना एक बंदूक, २१ जिवंत काडतुसे आणि पाच वापरलेली काडतुसं आढळून आली होती. ही पाच काडतुसं लोकांचा बळी देण्यासाठी वापरली असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 7:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'मी शंकराचा अवतार, तू माझ्यासोबत...', अशोक खरातने अल्पवयीन मुलालाही सोडलं नाही, नवी विकृती समोर






