पुण्यात बिबट्याचा थरार! रात्रीच्या अंधारात धावत्या दुचाकीवर झडप; तरुणाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मंचर जवळील चांडोली-लौकी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून घरी जाणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने भीषण हल्ला केला
पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत आता जीवघेणी ठरू लागली आहे. मंचर जवळील चांडोली-लौकी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून घरी जाणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यासोबत असलेल्या मित्राने प्रसंगावधान राखल्यामुळे दोघेही मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले आहेत.
नेमकी घटना काय?
लौकी गावचे रहिवासी असलेले किरण नवनाथ थोरात आणि त्यांचा मित्र पीयूष शंकर थोरात हे दोघे रात्रीच्या वेळी पल्सर दुचाकीवरून मंचर येथून आपल्या गावाकडे निघाले होते. चांडोली पार करून ते लौकी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचले. याचवेळी रस्त्याशेजारील उसाच्या दाट शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झडप घातली.
बिबट्याने दुचाकीवर झडप घालताच किरण थोरात यांच्या हाताला आणि पाठीच्या डाव्या बाजूला बिबट्याच्या नख्या लागून गंभीर जखमा झाल्या. हल्ल्यामुळे दुचाकीचा तोल गेला होता, मात्र किरण यांनी मोठ्या धैर्याने गाडीवर नियंत्रण मिळवले आणि आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. बिबट्या पुन्हा चाल करून येण्यापूर्वीच त्यांनी तिथून वेगाने दुचाकी पळवली. या थरारात पीयूष थोरात थोडक्यात बचावला.
advertisement
मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार
लौकी गावात पोहोचल्यानंतर या दोघांनी घडलेला थरार ग्रामस्थांना सांगितला. जखमी किरण थोरात यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक संपत तांदळे आणि वनसेवक जालिंदर थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
उसाच्या शेतांमुळे या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 11:03 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात बिबट्याचा थरार! रात्रीच्या अंधारात धावत्या दुचाकीवर झडप; तरुणाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्...









