शेतीवरून अनेक वर्षांपासून वाद
भांडेगाव येथील रहिवासी कुंडलिक जगताप आणि बाबाराव जगताप यांच्यात शेतीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या वादामुळे त्यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत होत्या. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुंडलिक जगताप हे त्यांचा मुलगा शिवराज जगताप (वय 29), तसेच सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांच्यासोबत बाबाराव जगताप यांच्या घरी गेले.
advertisement
कुंडलिक यांना तीन गोळ्या लागल्या
कुंडलिक यांनी दरवाजा वाजवताच, बाबारावने दरवाजा उघडून त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या गोळीबारात कुंडलिक यांना तीन गोळ्या लागल्या, तर त्यांचा मुलगा शिवराज जगताप यांच्या छातीत गोळी लागली. या दोन्ही बापा-लेकांचा जागेवरच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि तात्काळ तपास सुरू केला. रात्रीच पोलिसांनी भांडेगाव गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गोळीबारामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बाबाराव जगताप, विठ्ठल जगताप आणि ज्ञानेश्वर जगताप या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.