हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या मालकीच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते. त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली. गाडीतील लोकांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. मडके कारजवळ येताच कारमधील आरोपींनी त्यांना उचलून नेलं आणि बेदम मारहाण केली. याबाबतचा सगळा घटनाक्रम स्वत: मडके यांनी सांगितला.
advertisement
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा घटनाक्रम
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सांगितली की, बुधवारी सायंकाळी हॉटेलवर बरेच लोक जेवायला आले होते. तेव्हा तिथे कारमधून आलेल्या पाच लोकांनी मला सेल्फी काढायची असल्याचं सांगितलं. मी सेल्फी काढण्यासाठी कारच्या खिडकीजवळ गेलो. तेव्हा त्यांनी मला आत ओढून काच बंद केली. लगेच गिअर टाकून १४० च्या स्पीडने कार पळवली. डोळ्याच्या वरच्या बाजुला बुक्की घातली. अपहरण केल्यानंतर अपहरणकर्ते 'याला मारून टाकू' असं म्हणत होते. याचे हात जोपर्यंत तुटत नाहीत, जोपर्यंत हा मरत नाही, तोपर्यंत याला सोडायचं नाही, असंही आरोपी म्हणत असल्याचा दावा मडके यांनी केला.
'याला जामखेडपर्यंत न्यायचं, मारून पुलात टाकायचं, असं आरोपी म्हणत होते' असंही नागेश मडके यांनी सांगितलं. बुधवारी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. मागच्या १५ दिवसात ही दुसरी घटना आहे. याआधी मला धमकीचा फोन आला होता. आता मला पाच किलोमीटर फरपटत नेलं आणि वडगावच्या पुलावर फेकून दिलं. मला मारायच्या उद्देशानेच त्यांनी उचलून नेलं होतं. जीवे मारण्यासाठीच त्यांनी मला बुक्क्या मारल्या, असंही हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने सांगितलं.
विशेष म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा हॉटेलवर तैनात केलेले बाऊन्सर त्याच ठिकाणी होते. असं असताना कारमधील पाच जणांनी मडके यांचं अपहरण केलं, असा दावा त्यांनी केला आहे. खरं तर, मागील महिन्यात हॉटेल भाग्यश्रीवर हल्ला करून काही अज्ञातांनी तेथील पोस्टर फाडून टाकले होते. तसेच मागील आठवड्यात हॉटेलवर हाणामारी देखील झाली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या या हॉटेलमध्ये जेवणासाठी मोठी गर्दी होत आहे. काही महिन्यापासून चर्चेत आलेल्या या हॉटेलमध्ये सध्या बाऊन्सर तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील हॉटेलच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यामुळे या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
