पुणे : पश्चिम महाराष्ट्र हा खरंतर काँग्रेस राष्ट्रवादीचा पारंपरिक गड, पण याच साखरपट्ट्यात भाजपने महाविकास आघाडीची धुळधाण उडवून दिली. नाही म्हणायला अकलूजच्या मोहितेपाटील गटाने सोलापूर जिल्ह्यातले 4 मतदारसंघ राखून थोडीफार लाज राखली. शरद पवारांच्याच या बालेकिल्ल्यात भाजपने अजितदादा आणि शिवसेनेला सोबत घेऊन 58 पैकी तब्बल 46 जागा जिंकल्यात.
पश्चिम महाराष्ट्र हा खरंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा भरभक्कम असा बालेकिल्ला, ऊस कारखानदारी, दूध संघ, शिक्षणसंस्था असं सहकाराचं घट्ट जाळं विणून पवारांनी हा आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला होता, पण या विधानसभेत भाजपने महायुतीच्या जोरावर हाच गड पुरता नेस्तनाबूत करून टाकला.
advertisement
पश्चिम महाराष्ट्र पक्षीय बलाबल विधानसभा 2024
भाजप- 24
राष्ट्रवादी(AP) 11
शिवसेना(शिंदे गट) 07
राष्ट्रवादीचा(पवार गट) 07
उबाठा शिवसेना 02
काँग्रेस 01
जनसुराज्य 02
शेकाप 01
अपक्ष 03
एकूण 58
महायुती - 46
मविआ - 10
या संख्याबळावरून सहज कळतंय की भाजपने पवारांच्या या साखर पट्ट्यात किती खोलवर मुसंडी मारली ते. भाजपकडून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या दोन नेत्यांवर सोपवली होती.
पवारांच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांनी 4 सभा तर मोदींनी 2 सभा घेतल्या, त्या सर्व ठिकाणी यावेळी भाजपचेच आमदार निवडून आलेत. नाही म्हणायला ग्रामीण सोलापुरातल्या 4 जागा मोहिते पाटील गटाने पूर्ण ताकद लावून निवडून आणल्या पण सोलापूर शहर आणि परिसरात मात्र काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केवळ आपल्या राजकीय हट्टापायी चित्र विचित्र भूमिका घेऊन मविआच्या हक्काच्या 5 जागा गमावल्याचा आरोप मविआतून होतोय.त्याच रागातून उबाठाने तर थेट खासदारबाईंच्या फोटोलाच जोडे मारो आंदोलन केलं होतं.
दोन फॅक्टरनी फिरली निवडणूक
थोडक्यात कायतर पश्चिम महाराष्ट्रात मविआत कुठेही ताळमेळ दिसला नाही. सांगलीतही विश्वजीत कदमांनी आपली आमदारकी राखल्याने काँग्रेसला कशीबशी एक जागा मिळाली नाही तर भोपळात हाती आला होता. बाकी मग इकडेही पश्चिम महाराष्ट्रातही महायुतीने लाडकी बहिण आणि हिंदुत्वाच्या जोरावर खोऱ्याने मतं घेतली.
पश्चिम महाराष्ट्रावर खरंतर भाजपचा गेली अनेक वर्षे डोळा होता, पण पवार काही केल्या जमू देत नव्हते. पण या यावेळी भाजपने अजितदादांना सोबत घेऊन पवारांचा हा एकमेव बुरूजही पुरता ढासळून टाकलाय. खरंतर तासगावचीही सीट गेल्यात जमा होती पण अजित दादांनीच तिकडे आर आर आबांवर मृत्यू पश्चात काही आरोप केल्याने तेवढी सीट वाचली. जयंतराव पाटलांचं मताधिक्य प्रचंड घटल्याने पवारांना पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा खूप मोठी डागडुजी करावी लागणार आहे, हे मात्र नक्की.
