नेमका वाद कशामुळे झाला?
मृत बाळासाहेब सरवदे यांची चुलत वहिनी रेखा दादासाहेब सरवदे या प्रभाग २ क मधून भाजपकडून इच्छुक होत्या. त्याच प्रभागात भाजपकडून शालन शिंदे यांना एबी फॉर्म देण्यात आले. पक्षातील नेत्यांनी रेखा यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी अर्ज माघारी घेतला. यासाठी शुक्रवार सकाळी साडेदहाच्या सुमारास परिसरात बैठक झाली. पुन्हा एक-दोन बैठका झाल्या, यानंतर समझोता झाल्यानंतर रेखा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
advertisement
अर्ज मागे घेतल्यानंतरही डिवचणारे स्टेटस
पण त्यानंतर शिंदे यांच्या गटातील काहींनी डिवचणारे, चिडवणारे मोबाईल स्टेटस ठेवले. शिवाय रेखा सरवदे यांच्या घराजवळून दुचाकी जोराने नेणे, गोंधळ घालणे, असे सुरू झाले. याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे आपल्या काही समर्थकांसह शिंदे यांच्या ऑफिसमध्ये गेले. इथं बाचाबाची झाल्यानंतर याचं पर्यवसान थेट हत्येत झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, सरवदे शिंदे यांच्या ऑफिसमध्ये जाब विचारला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, आम्ही काहीही करू असे म्हणून शंकर शिंदे यांच्या गटाने भांडणाला सुरुवात केली. त्याचवेळी शंकर शिंदे याने यांना जिवंत सोडायचं नाही, यांना लय मस्ती आली आहे, असं म्हणाला. त्यावेळी तानाजी, विशाल शिंदे हे तलवार घेऊन आले, तर अलोक शिंदे आणि दादू दोरकर यांनी कोयता आणला. त्यावेळी भाजपच्या उमेदवार शालन शिंदे आणि शारदा यांनी मृत बाळासाहेबाच्या डोळ्यात चटणी टाकली.
दोघांनी हातपाय पकडले, दोघांनी तलवारीने वार केले
याचाच फायदा घेऊन शंकर शिंदे याचे साथीदार राहुल आणि सुनील यांनी सरवदे यांचे हात पकडून ठेवले. त्याचवेळी तानाजी आणि विशाल शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्यावर तलवारीने वार करून जखमी केले. बाळासाहेब खाली पडल्यावर आरोपी विशाल याने दंड थोपटल्याचं देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येचा घटनाक्रम
- सकाळी १०.३० वाजता : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे आणि सरवदे गटामध्ये बैठक झाली.
- दुपारी २ वाजता : उमेदवारी अर्ज सरवदे यांनी मागे घेतला.
- संध्याकाळी ४.३० वाजता : भाजप उमेदवार शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन सरवदे यांनी विचारणा केल्याने वादावादीला सुरुवात.
- संध्याकाळी ४.५० वाजता : वादाचे रुपांतर भांडणात होऊन परिसरात दगडफेक सुरू झाली. यातच धारदार हत्यारांनी बाळासाहेब याच्यावर हल्ला झाला.
- संध्याकाळी ५.०० वाजता : घटनेत जखमी झालेल्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
- संध्याकाळी ५.१५ वाजताः दोन्ही गट खासगी दवाखान्यात आमने-सामने आल्याने तेथे पुन्हा वाद होऊन हाणामारी झाली.
- संध्याकाळी ५.२० वाजता : बाळासाहेब सरवदे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
- संध्याकाळी ७.०० वाजता : नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे काहीवेळ परिसरात तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला
