TRENDING:

सावित्री-ज्योतिबांच्या कर्तृत्वाचा असाही जागर, पुण्यात जमला देश-विदेशातील 800 कवींचा मेळा, Video

Last Updated:

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा, कार्याचा आणि त्यागाचा जागर करणारा चार दिवसीय दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल सावित्री–ज्योतिबांच्या काव्यरचनांनी, विचारमंथनाने आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी भारावून गेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा, कार्याचा आणि त्यागाचा जागर करणारा चार दिवसीय दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल सावित्री–ज्योतिबांच्या काव्यरचनांनी, विचारमंथनाने आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी भारावून गेला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या फेस्टिव्हलने संविधान, स्त्रीशिक्षण, समता आणि मानवमूल्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न केला आहे.
advertisement

अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती भारतीय संविधान आणि ओठांवर सावित्री–ज्योतींचा जयघोष करत सावित्रीबाईंच्या वेशभूषेत अवतरलेल्या शेकडो लेकींनी सभागृहात जणू इतिहास जिवंत केला. डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट परिधान करून महात्मा फुलेंच्या पेहरावात आलेले आयोजक विजय वडवेराव यांच्यासह सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे संविधानाचा जागर केला. या दृश्याने नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनचे सभागृह क्षणभरासाठी भिडेवाड्यात रूपांतरित झाल्याचे चित्र अनुभवायला मिळाले.

advertisement

Street Dogs : एवढंच राहिलं होतं! शिक्षकांना आता श्वानांचं सर्वेक्षण करावं लागणार, शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानं संताप

भिडेवाडाकार फुलेप्रेमी कवी आणि संविधानदूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून, देशातील मुलींची पहिली शाळा ज्या भिडेवाड्यात सुरू झाली, त्या ऐतिहासिक स्मृतीला केंद्रस्थानी ठेवत आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवर कवींच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाचे उद्घाटन झाले असून, 5 जानेवारीपर्यंत हा फेस्टिव्हल रंगणार आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातून तब्बल 800 हून अधिक कवी, साहित्यिक, विचारवंत आणि कलाकार या महोत्सवात सहभागी झाले आहेत.

advertisement

View More

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेत कवी–कवयित्रींनी सादर केलेल्या काव्यरचनांनी सभागृहात सामाजिक परिवर्तनाचा सूर घुमवला. फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, विचारांचा जागर आणि आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाऱ्या या महामानवांच्या कार्याची आठवण प्रत्येक सादरीकरणातून ठळकपणे अधोरेखित होत होती.

advertisement

देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि हा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. काव्यसंमेलनासह भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगीतिक पोवाडे तसेच महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी व दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम या फेस्टिव्हलमध्ये होत आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी यांसह अनेक देशांमधून तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी राज्यांतून कवी–कवयित्री सहभागी झाले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाणी पिण्याकडे करताय दुर्लक्ष, वेळीच व्हा सावध, नाहीतर होतील हे गंभीर आजार Video
सर्व पहा

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. फुले विचार ही केवळ संकल्पना नसून ती एक चळवळ आहे. हा विचार पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जात असल्याचे आयोजक विजय वडवेराव यांनी सांगितले. कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्त्रीशिक्षणाचा पाया रोवणाऱ्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अभियान राबवण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी बातम्या/पुणे/
सावित्री-ज्योतिबांच्या कर्तृत्वाचा असाही जागर, पुण्यात जमला देश-विदेशातील 800 कवींचा मेळा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल