तज्ज्ञांनी सांगितले की, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की सर्वप्रथम डिहायड्रेशनची लक्षणे दिसून येतात. सतत थकवा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, तोंड कोरडे पडणे आणि कामात लक्ष न लागणे ही त्याची प्राथमिक चिन्हे आहेत. ही अवस्था दीर्घकाळ राहिल्यास शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे साधे आजारही गंभीर स्वरूप धारण करू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
अंड्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? मग एकदा 'घोटाळा' करा, रेसिपी अशी की रोज बनवाल, Video
पाणी कमी पिण्यामुळे मूत्रसंस्थेवर मोठा परिणाम होतो. पुरेसे पाणी न घेतल्यास शरीरातील अपायकारक घटक योग्य प्रकारे बाहेर टाकले जात नाहीत. यामुळे मूत्रपिंडात खडे (किडनी स्टोन) होण्याचा धोका वाढतो. तसेच मूत्रसंस्थेचे संसर्ग (UTI) होण्याची शक्यता वाढून लघवी करताना जळजळ, वेदना आणि वारंवार लघवी होणे असे त्रास उद्भवतात. काही प्रकरणांत या संसर्गाचा किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, पाणी कमी प्यायल्याने रक्त घट्ट होते, ज्यामुळे उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय पचनसंस्थेवरही याचा परिणाम होतो. पाणी कमी असल्याने बद्धकोष्ठता (कब्ज), गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास वाढतो. त्वचेला आवश्यक ओलावा न मिळाल्याने त्वचा कोरडी, निस्तेज दिसू लागते आणि अकाली सुरकुत्या पडतात.
या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना पाणी पिण्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. दररोज किमान 8 ते 10 ग्लास स्वच्छ पाणी पिणे, उन्हाळ्यात आणि शारीरिक श्रमानंतर पाण्याचे प्रमाण वाढवणे आणि तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी पिण्याची सवय लावावी, असा सल्ला देण्यात आला आहे. पाणी ही आरोग्याची मूलभूत गरज असून तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही यावेळी तज्ज्ञांनी दिला.





