संक्रांत जवळ आलीये, पण पुण्यातील कुंभार बांधवानं सांगितलं धक्कादायक वास्तव, Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Makar Sankrant: संक्रांतीसाठी लागणाऱ्या खण म्हणजे मडकी बनवण्याचा व्यवसाय अजय शिंदे हे गेल्या दोन पिढ्यांपासून करत आहेत.
पुणे: सध्याच्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाची लगबग आता बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. मकर संक्रांतीला खणाला विशेष महत्त्व असतं. कुंभार समाजासाठी हा सण आर्थिक बाजूने खूप महत्त्वाचा असतो. आता संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे खण म्हणजे मडकी बनवण्याच्या कामाला वेग आलाय. या व्यवसायामागील आर्थिक गणित काय आहे, या काळात कुंभारांना किती नफा मिळतो? याविषयी पुण्यातील कुंभार बांधव अजय शिंदे यांनी सांगितलं आहे.
संक्रांतीसाठी लागणाऱ्या खण म्हणजे मडकी बनवण्याचा व्यवसाय अजय शिंदे हे गेल्या दोन पिढ्यांपासून करत आहेत. संक्रांतीच्या आधी साधारण दोन महिन्यांपासून खण बनवण्याची तयारी सुरू केली जाते. या प्रक्रियेत आधी माती विकत आणली जाते. त्यानंतर त्या मातीवर प्रक्रिया करून हाताने मडकी घडवली जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मडकी बनवण्याचा हा पारंपरिक व्यवसाय तोट्यात जात असल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले.
advertisement
नेमकं कारण काय?
गेल्या काही वर्षांपासून मडकी घडवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी माती सहज उपलब्ध होत होती, मात्र आता माती विकत आणावी लागते. त्यासाठी वाहतुकीचा अतिरिक्त खर्च येतो. एका ट्रॅक्टरसाठी किमान 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो, असे अजय शिंदे यांनी सांगितले. यानंतर कामगारांचा खर्च असतो. एका फेरीत साधारण 8 ते 10 हजार मडकी तयार होतात. मात्र मडकी घडवताना काही फुटतात, तर काही खराब होतात. त्यामुळे प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध मडक्यांची संख्या कमी होते, असंही शिंदे सांगतात.
advertisement
पूर्वीसारखा सण होत नाही
पूर्वी कुटुंबातील प्रत्येक महिलेसाठी स्वतंत्र खण घेतला जात असे. आता अनेक ठिकाणी एकच खण घेतला जातो. त्यातच खणाच्या दरातही कमी-जास्तपणा केला जातो. या सर्व कारणांमुळे मडकी व्यवसायातून पूर्वीसारखा नफा मिळत नसल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, यंदा सुमारे 10 ते 15 हजार मडकी (खण) तयार करण्यासाठी 35 ते 40 हजार रुपयांचा खर्च आल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले. हा खर्च जाऊन किमान 30 हजार रुपयांचा नफा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 2:40 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
संक्रांत जवळ आलीये, पण पुण्यातील कुंभार बांधवानं सांगितलं धक्कादायक वास्तव, Video








