Street Dogs : एवढंच राहिलं होतं! शिक्षकांना आता श्वानांचं सर्वेक्षण करावं लागणार, शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानं संताप
Last Updated:
School Premises Teachers to Control Stray Dogs : शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांवर आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली असून शाळेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखणे आणि आवार सुरक्षित ठेवण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे.
मुंबई : आधीच विविध शिक्षणाशिवाय अन्य कामांच्या ओझ्याखाली काम करणाऱ्या शिक्षकांवर आता आणखी एक नवी जबाबदारी टाकण्यात आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नव्या आदेशानुसार प्रत्येक शाळेत एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून शाळेच्या परिसरातील स्वच्छतेसोबतच भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्याची जबाबदारीही त्या शिक्षकावर सोपवण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांनी याबाबत काढलेल्या परिपत्रकाविरोधात राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी निषेध नोंदवला आहे.
भटके कुत्रे हाकलण्याची जबाबदारी थेट शिक्षकांवर
देशभरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांच्या हल्ल्यांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांना परिसर स्वच्छता आणि सुरक्षेसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याबाबत परिपत्रक जारी केले होते.
advertisement
यामुळे आता शालेय शिक्षण विभागानेही प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी नवीन परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. या शिक्षकाचे नाव, संपर्क क्रमांक आणि जबाबदारीची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर ठळक अक्षरांत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ही माहिती स्थानिक महापालिका, नगरपरिषद किंवा संबंधित यंत्रणेला देणेही आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
advertisement
शाळेच्या परिसरात भटके कुत्रे येऊ नयेत तेथे त्यांचा मुक्काम किंवा निवारा होऊ नये याची जबाबदारी संबंधित नोडल शिक्षकावर राहणार आहे. मात्र आधीच गणना, निवडणूक कामे, सर्वेक्षण, प्रशासकीय अहवाल यांसारख्या कामांमुळे त्रस्त असलेल्या शिक्षकांवर आणखी अशी जबाबदारी टाकणे अन्यायकारक असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, मात्र त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 2:34 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Street Dogs : एवढंच राहिलं होतं! शिक्षकांना आता श्वानांचं सर्वेक्षण करावं लागणार, शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानं संताप








