पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १५ मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पती आणि पत्नी असे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आदित्य फत्तेपुरकर आणि स्मिता फत्तेपुरकर हे दोघेही महिला आणि पुरुष अशा जागांवरून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, पती-पत्नी जोडीने जाऊन 'होम टू होम' प्रचार करताना सुद्धा दिसतायत. त्यामुळे सध्या शहरात पती-पत्नीच्या उमेदवारीची मोठी चर्चा असलेली पाहायला मिळते.
advertisement
विशेष म्हणजे, आदित्य फत्तेपूरकर हे काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष आहेत. सुशील कुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून फत्तेपूरकर यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी पाच वर्ष नगरसेवक म्हणून आणि एक वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून आदित्य फत्तेपूरकर यांनी पंढरपूर नगरपालिकेचा कारभार पाहिलाय. तसेच पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक म्हणून आदित्य फत्तेपूरकर काम पाहतात.
पंढरपुरातील जी मोजकी काँग्रेस प्रेमी घराणे आहेत. अशांमध्ये फत्तेपूरकर यांच्या घराचा समावेश आहे. पंढरपुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थांचे प्रमुख व्यवस्थापक म्हणून फत्तेपूरकर यांच्याकडे जबाबदारी आहे. पंढरपूरच्या होळकर वाड्यात येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा स्मिता आणि आदित्य असे हे दांपत्य कायम करत आले आहे. काँग्रेस घराणं जरी असले तरी होळकर वाड्यातील श्रीराम मंदिरातील उत्सव देखील मोठ्या प्रमाणावर फत्तेपूरकर कुटुंबीयांच्या पुढाकारातून होळकर संस्थानमध्ये चालवला जात आहे.
तसंच पंढरपूरच्या इतिहासाची पाने चालताना गांधी घराण्यातील अनेक मातब्बर नेते, स्वातंत्र्यवीर सावरकर असे हिंदुत्ववादी नेते यांच्याशी देखील सलोख्याचे संबंध ठेवणारे कुटुंब म्हणून फत्तेपूरकर कुटुंबाकडे पाहिले गेले. याच कुटुंबातील आदित्य फत्तेपूरकर आपली पत्नी स्मिता फत्तेपूरकर यांच्यासोबत सध्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून निवडणुकीत मतदारांच्या समोर जात आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कोण जिंकणार, याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागलं आहे.
