त्याचं झालं असं की, "मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे. नांदेड बस स्थानकाच्या तक्रार पेटीमध्ये चिट्ठी टाकलेली आहे. त्यात बॉम्ब स्फोट होणार आहे अशी माहिती नांदेडच्या पोलीस नियत्रंण कक्षाला एकाने फोन करून दिली. 5 मार्च रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. गजा मारणे हा पुण्यातला कुख्यात गुंड आहे. आता या गुंडाच्या माणसाने फोन तर केला नाही? त्यामुळे पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली. नांदेड शहरातील बस स्थानकात बंदोबस्त वाढवण्यात आला. त्या परिसरात असलेल्या पोलिसांना तक्रारपेटी तपासण्या सांगण्यात आलं. त्यात बॉम्बस्फोट होणार असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळली. आता चिठ्ठी आढळल्यामुळे फोन खरा होता, याची खात्री झाली. पण हा फोन केला कुणी?
advertisement
बीडच्या अंबाजोगाईमधून फोन
पण, आता फोन कुणी केला, याचा तपास वजीराबाद पोलिसांनी सुरू केला. सायबर सेलच्या मदतीने तपास करण्यात आला. तेव्हा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून फोन आल्याचे निष्पन्न झालं. वजीराबाद पोलिसांनी अंबाजोगाई गाठली. एका पाणीपुरी वाल्याच्या मोबाईल वरून तो फोन करण्यात आल्याचं उघड झालं. पोलिसांनी पाणीपुरी वाल्याची चौकशी केली, तेव्हा एका अज्ञाताने तरुणाने महत्त्वाचा फोन करायचा म्हणून मोबाईल घेतला होता, असं त्यानं सांगितलं.
३५ वर्षीय तरुणाचं कांड
आता पाणीपुरीवाल्याकडून पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन प्राप्त केलं. स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. सगळ्या अंबाजोगाईमध्ये शोध घेतला असता मनियार गल्ली रवीवार पेठ इथं पोलीस पोहोचले. पोलिसांनी तिथून 35 वर्षीय शेख सलीम शेख चांदपाशा याला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी जेव्हा शेखला खाक्या दाखवल्या तेव्हा "आपणचं फोन करून, बस स्थानकात चिठ्ठी टाकून खोटी माहिती दिली" अशी कबुली आरोपी शेख सलीम याने पोलिसांना दिली. हा शेख मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. वजीराबाद पोलिसांनी या शेख सलीमला ताब्यात घेतलं आहे. त्याने याआधीही छत्रपती संभाजीनगरमध्ये असेच प्रकार केले होते. तो मनोरुग्ण आहे की नाही, याबद्दल वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल केले असून अटकेची प्रक्रिया सुरूआहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
