भारत पाकिस्तानमधील संघर्ष तीव्र होत असताना आता दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर देखील अलर्ट मोडवर दिसत आहे. किनारपट्टी भागात सुरक्षा यंत्रणांनी आपली गस्त वाढली आहे. सगळी यंत्रणा अलर्ट मोडवर असताना दुसरीकडे रात्री पोलिसांकडून अचानक तपासणी करण्यात आली. तर, काही ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली.
सिंधुदुर्गात समुद्रकिनाऱ्या लगत 92 लँडिंग पॉइंट आहेत. त्या ठिकाणी पोलिसांची गस्त पाहायला मिळाली. तर रेडी बंदर, विजयदुर्ग बंदर ,मालवण बंदर, देवगड बंदर, निवती बंदर, आचरा बंदर, वेंगुर्ला बंदर, या सर्वच ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सागर सुरक्षा सदस्यांना देखील सतर्क राहून संशयित बोटी दिसल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना कळवण्याची सूचना करण्यात आली आहे.
advertisement
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय, अतिरिक्त पोलीस देखील तैनात करण्यात आले. एखादा अनोळखी संशयित व्यक्ती दिसल्या अथवा संशयित वस्तू आढळल्यास 112 किंवा सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली आपात्कालीन बैठक
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपात्कालीन बैठक बोलावली आहे. आज दुपारी ही उच्चस्तरीय सुरक्षा बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील स्थितीचे आकलन करणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना आखण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानमधील एअर स्ट्राइकनंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे आदी ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
