इराणमध्ये हल्ले सुरू असताना महाराष्ट्रात मात्र अफवांचे पेव फुटले आहेत. WhatsApp आणि इतर सोशल मीडियावर पेट्रोल डिझेलची कमतरता भासू शकते अशा अफवा व्हायरल होत असताना लोकांनी टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली. इस्राईल आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेत सुरू झालेल्या युद्धाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील जनजीवनावर पाहायला मिळतोय. पण हा परिणाम युद्धाचा नसून, सोशल मीडियावर पसरलेल्या एका व्हायरल अफवेचा आहे.
advertisement
पेट्रोल संपणार, डिझेल महागणार आणि पंप बंद होणार या एका मेसेजने मंगळवारी रात्री संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला. छत्रपती संभाजीनगरपासून ते हिंगोलीपर्यंतच्या पेट्रोल पंपांवर रात्री २ वाजेपर्यंत वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा आणि प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. लोक
गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमध्ये तणाव वाढला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होईल आणि भारतात इंधन टंचाई निर्माण होईल,अशी चर्चा जागतिक स्तरावर सुरू आहे. मात्र, या चर्चेचे रूपांतर स्थानिक स्तरावर भीषण अफवेत झाले. त्यातच भर म्हणजे, रविवार आणि धुलीवंदनाच्या सुट्ट्यांमुळे काही डेपोंमधून इंधनाचा पुरवठा होण्यास तांत्रिक उशीर झाला होता. हाच धागा पकडून "पेट्रोलचे साठे संपले आहेत" असा मेसेज वाऱ्यासारखा पसरला.
१. छत्रपती संभाजीनगर: रात्री उशिरापर्यंत धावपळ
शहरातील जालना रोड, सिडको आणि रेल्वे स्टेशन परिसरातील पेट्रोल पंपांवर रात्री १० नंतर अचानक गर्दी वाढली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. रविवार आणि सोमवारच्या सुट्ट्यांमुळे काही पंपांवर साठा कमी होता, तिथे 'नो स्टॉक'चे बोर्ड लागताच लोकांची भीती अधिकच वाढली. प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार, ही गर्दी केवळ भीतीपोटी होती.
२. नांदेड: सकाळी परिस्थिती सामान्य
नांदेडमध्येही रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपांवर झुंबड उडाली होती. तरुण आणि नोकरदार वर्ग गाड्यांच्या टाक्या फुल करण्यासाठी रांगा लावून उभे होते. मात्र, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केल्याने आणि सकाळी पुन्हा पुरवठा सुरू झाल्याने आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. शहरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
३. हिंगोली (वसमत): डबे आणि कॅन घेऊन पेट्रोलसाठी गर्दी
सर्वात विचित्र परिस्थिती हिंगोलीच्या वसमत शहरात पाहायला मिळाली. इथे नागरिक केवळ गाड्या घेऊन आले नव्हते, तर हातात मोठे कॅन, प्लास्टिकचे डबे आणि बाटल्या घेऊन पंपांवर धावले होते. "दोन-तीन दिवस पंप बंद राहणार" या अफवेने लोकांची झोप उडवली होती. पंप चालकांना ही गर्दी नियंत्रित करताना अक्षरशः नाकी नऊ आले होते.
४. अमरावती (अंजनगाव सुर्जी): मध्यरात्रीची कसरत
अमरावतीच्या निमखेड बाजार परिसरातही पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीची अफवा पसरली. मध्यरात्री भाव वाढणार या भीतीने अनेकांनी रात्री उशिरा पंपावर धाव घेतली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरच्या टाक्या फुल करून घेतल्या.
5 वाशिम: पेट्रोल भरण्यासाठी भलीमोठी रांग
वाशिममध्ये देखील पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठी रांग आहे. CNG च्या रांगेतही गर्दी पाहायला मिळाली. या सर्व गोंधळानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, देशात इंधनाचा तुटवडा नाही. इंधन कंपन्यांकडे (HPCL, BPCL, IOCL) पुरेसा साठा असून केवळ सुट्ट्यांमुळे पुरवठा साखळीत झालेला थोडासा विलंब हा टंचाईचा संकेत नाही.
महत्त्वाचं म्हणजे, सध्या पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात कोणतीही मोठी दरवाढ झालेली नाही. सोशल मीडियावरील कोणत्याही अनधिकृत मेसेजवर विश्वास ठेवू नका. "पेट्रोल पंप बंद होणार" हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. अफवांमुळे होणारी गर्दीच उलट टंचाई निर्माण करू शकते. त्यामुळे शांतता राखा आणि आवश्यक असेल तरच पेट्रोल भरण्यासाठी जा.
