हरि बाबूराव जोगदंड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी बापाचं नाव आहे. तो जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी ५ सप्टेंबरला आरोपी हरि बाबूराव जोगदंड याने पोलिसांना फोन केला होता. आपल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण पंचनामा करत असताना ही आत्महत्या नसून घातपात असावा, असा पोलिसांना संशय आला.
advertisement
यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर वडिलांनीच केल्याचं समोर आलं. मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब आरोपी वडिलांना मान्य नव्हती. या प्रेमप्रकरणावरून समाजात आपली बदनामी झाल्याचा राग बापाच्या मनात होता. याच रागातून त्याने मुलीचा गळा दाबून खून केला. हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपी बापाने मुलीच्या गळ्याला दोरी बांधून तिला लोखंडी अँगलला लटकवले, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी हरि बाबूराव जोगदंड याला अटक केली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करत बापाने मुलाचा झोपल्या जागीच खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे दावलवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.