नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश केशव गावंडे असं मृत पावलेल्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. हा तरुण शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आनवा येथून भोकरदन शहराकडे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून निघाला होता. प्रवासादरम्यान अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. काही कळायच्या आतच त्याला हृदयविकाराचा झटका आला. हा झटका इतका तीव्र होता की, गणेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो रस्त्यावरच कोसळला.
advertisement
स्थानिकांची धाव, पण वेळ निघून गेली होती
हा अपघात पाहून रस्त्यावरील इतर प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं गणेशच्या दिशेनं धाव घेतली. त्याला मदत करण्यासाठी नागरिकांनी तत्परता दाखवत जवळच्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच गणेशची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे सांगितले जात आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
गणेशच्या मृत्यूची बातमी समजताच आनवा गावावर शोककळा पसरली आहे. अवघ्या २५ वर्षांच्या तरुणाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिला. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
