मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहेत. संचारबंदीनंतर अंतरवालीमधील मंडप रिकामा करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारी डॉक्टरकडून उपचार घेतले आहेत. त्यांनी सलाईन घेत संयमाची भूमिका घेतलीय. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना जरांगे पाटील यांनी माघारी पाठवले असून अंतरवाली सराटीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.
advertisement
“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन. सगळ्यांनी शांततेत आपआपल्या गावी जावं.” मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईला जाणे टाळले. पुन्हा अंतरवाली सराटीकडे फिरले. कायद्याचा आणि पोलिसांचा सन्मान म्हणून एक पाऊल मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच देवेंद्र फडणवीस घाबरले आणि त्यांनी संचारबंदी लावल्याचा आरोप केला आहे.
अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेलीय. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केलीय.
