जुन्या काळात दररोजच्या वापरात असलेल्या अनेक पारंपारिक वस्तू आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पारंपारिक वस्तू तयार करण्यासाठी कारागीरच न उरल्याने अनेक व्यवसाय देखील अखेरचे घटका मोजत आहेत. परंतु, काही जुन्या जाणत्या कारागिरांनी काही व्यवसाय जिवंत ठेवलेत. त्यापैकीच एक म्हणजे फडा निर्मितीचा हा व्यवसाय. थोरात कुटुंब जालन्यातील सोलगव्हाण येथे मागील अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय करत आहे.
advertisement
पूर्वी गावातीलच सिंधीच्या झाडांची पाने गोळा करून फड्यांची निर्मिती केली जायची. परंतु, आता सिंधीची झाडेच मोजकीच उरल्याने बाहेरून कच्चामाल मागवला जातो. दिवसभरात वीस ते पंचवीस फड्यांची निर्मिती केली जाते. या फड्यांना बाजारात 50 ते 60 रुपये प्रति नग असा दर मिळतो. मंठा येथील व्यापारी थोरात कुटुंबाकडील फडे घरपोच घेऊन जातो. महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपये हे कुटुंब या पारंपारिक व्यवसायाच्या माध्यमातून कमवत आहे. कुटुंबाच्या उपजीविकेबरोबरच पारंपारिक व्यवसायाला जिवंत ठेवण्याचे काम देखील या कुटुंबाकडून होत आहे.
50 पैशांना एक फडा होता तेव्हापासून आम्ही फडा निर्मितीचा व्यवसाय करतो. सिंधीच्या पानांना वाळू घालावे, त्यांना जोडणे, त्यानंतर पन्हाळ्या काढणे, पड बनवणे, पड बनवल्यावर जुड्या धरणे, त्यानंतर त्यांना बांधणे आणि शेवटी फड्याला विंचरणे अशा पद्धतीने फडा तयार करणे हे एक किचकट काम असल्याचे भागुबाई थोरात यांनी सांगितले.





