याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी येथे सुरू असलेल्या कामामुळे कोकणातून मुंबईत परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तेजस, जनशताब्दी आणि मंगळुरू या तिन्ही गाड्या 31 ऑगस्टपर्यंत सीएसएमटीपर्यंत येऊ शकणार नाहीत. मंगळुरू एक्सप्रेस सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावेल. त्यामुळे ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी प्रवाशांना पुन्हा लोकल किंवा पर्यायी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागेल. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागेल.
advertisement
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाचं कामं सुरू आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील रेल्वे इतर प्लॅटफॉर्मवर उभ्या केल्या जातात. तर, काही प्लॅटफॉर्मअभावी काही गाड्यांचा सीएसएमटीमधील थांबा रद्द केला जातो. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे गाडी क्रमांक 12134 मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत येणार आहे. गाडी क्रमांक 22120 मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 12052 मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस दादरपर्यंत येणार आहेत.