रिंकी प्रधान असं हत्या झालेल्या २३ वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. तर किशोर प्रधान असं ३१ वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. रिंकी प्रधान ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. ती नियमितपणे रील बनवून पोस्ट करायची. यातूनच पती-पत्नीत वारंवार वाद होत असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती किशोर प्रधान हा मेकॅनिक म्हणून काम करतो. रिंकी वारंवार फोनवर दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत असल्याचा संशय किशोरच्या मनात होता. या संशयातून सोमवारी रात्री दोघांमध्ये तीव्र वाद झाला. हा वाद इतका वाढला की, संतापाच्या भरात आरोपी पतीने रिंकीच्या डोक्यावर एका जड वस्तूने प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात रिंकी गंभीर जखमी झाली.
advertisement
जखमी अवस्थेत रिंकीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर, आरोपी पतीने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याने एमआयडीसी पोलिसांना सांगितले की, रिंकी घरी पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला आणि तिचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांना संशय आल्यामुळे मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले.
पोस्टमॉर्टम अहवालातून सत्य समोर आले. अहवालानुसार, रिंकीच्या डोक्यावर एक नव्हे तर अनेक दुखापती असल्याचं स्पष्ट झाले आणि याच कारणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. वैद्यकीय अहवालाने खुनाच्या दिशेने बोट दाखवताच पोलिसांनी आरोपी पती किशोर प्रधान याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर अखेर त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. संशयाच्या भरात आणि रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पती किशोर प्रधान याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
