या दुर्दैवी घटनेत वडील मारुती बंडू कुंडले (वय ७२) आणि धाकटा भाऊ शितल मारुती कुंडले (वय ४०) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले (वय ४७) याच्यावर खुनाचा आरोप ठेवत त्याला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडले कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. या जमिनीच्या तुकड्यावरून दोन भावांमध्ये वारंवार खटके उडत असत, ज्यामुळे घरात नेहमीच तणावाचं वातावरण असायचं. रविवारी सायंकाळच्या सुमारास याच शेतजमिनीच्या कारणावरून संभाजी, शितल आणि वडील मारुती यांच्यात पुन्हा एकदा जोरदार बाचाबाची झाली.
advertisement
हा वाद वाढत गेल्यानंतर संभाजीला संताप अनावर झाला. त्याने रागाच्या भरात धारदार शस्त्राने वडील आणि लहान भावावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, मारुती कुंडले आणि शितल कुंडले दोघंही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून संशयित ताब्यात
घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, मुख्य संशयित आरोपी संभाजी कुंडले याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
