मुंबईतील असं ठिकाण, जिथं एकाच वेळी होते 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन, तुम्ही दिलीये कधी भेट? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
सन 1945 मध्ये स्थापन झालेल्या या आश्रमाची ओळख खास एका वैशिष्ट्यासाठी आहे. इथे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येते.
मुंबई : मुंबईला जसा समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे, तसाच आध्यात्मिक वारसाही आहे. मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर यांसारखी अनेक मंदिरे या परंपरेची साक्ष देतात. त्याचप्रमाणे विले पार्ले (पश्चिम) मधील संन्यास आश्रम हे ठिकाणही भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. सन 1945 मध्ये स्थापन झालेल्या या आश्रमाची ओळख खास एका वैशिष्ट्यासाठी आहे. इथे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येते.
देशभर पसरलेल्या सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घृष्णेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकात्मक शिवपिंडी येथे स्थापित करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना एका जागी सर्व ज्योतिर्लिंगांची पूजा करण्याची संधी मिळते. अनेक भाविक विशेषतः श्रावण महिना, सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी येथे येऊन सर्व ज्योतिर्लिंगांची एकत्र पूजा करतात.
advertisement
या आश्रमाची आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे येथे सर्व शिवपिंडी एका विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या आहेत ज्यामुळे भक्त परिक्रमा करताना एकाच वेळी सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करू शकतात. काही भाविक येथे 12 वेळा प्रदक्षिणा घालून बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केल्याचा आध्यात्मिक अनुभव घेतात.
आश्रम परिसरात आणखी एक आकर्षण म्हणजे नऊ देवींचे मंदिर. येथे सरस्वती, अंबा, खोडियार, चामुंडा, गायत्री, पार्वती, रुक्मिणी, शीतला आणि सीता माता यांचे एकत्र दर्शन होते. नवरात्र काळात येथे विशेष पूजा, आरती आणि भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे वातावरण अधिकच धार्मिक होते.
advertisement
येथील वातावरण हे शहराच्या गोंगाटापासून वेगळे आणि शांत आहे. सकाळच्या वेळेला मंत्रोच्चार, घंटानाद आणि आरतीमुळे एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. अनेकजण येथे ध्यान आणि साधनेसाठी ठराविक वेळ घालवतात. विशेष म्हणजे, काही भाविक रोज सकाळी येथे येऊन जप-तप आणि योगाभ्यासही करतात.
आश्रमात असलेली गोशाळा ही देखील येथे येणाऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. येथे गायींची चांगल्या प्रकारे देखभाल केली जाते आणि अनेक भक्त येथे येऊन गोसेवा करतात. काही जण विशेष दिवसांवर गोदान किंवा अन्नदानही करतात.
advertisement
याशिवाय, येथे नियमित सत्संग, प्रवचन आणि धार्मिक शिबिरे आयोजित केली जातात. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाची सुविधा येथे उपलब्ध आहे. विवाह आणि इतर कार्यक्रमांसाठी मॅरेज हॉलची सुविधा असल्यामुळे हे ठिकाण सामाजिक उपक्रमांसाठीही वापरले जाते. विले पार्ले रेल्वे स्थानकापासून सुमारे 10 मिनिटांच्या अंतरावर कमला नगर, पी.जे. बजाज रोडवर हा आश्रम स्थित असल्याने येथे पोहोचणे सोपे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 11:19 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
मुंबईतील असं ठिकाण, जिथं एकाच वेळी होते 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन, तुम्ही दिलीये कधी भेट? Video








