गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला उकळी फुटली असून विद्यमान अध्यक्षांनी बंड करत सत्ताधाऱ्यांना धक्का दिलाय. सतेज पाटील आणि मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या या संघात महायुती आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली करत असून पहिल्यांदाच राज्य पातळीवरचे नेते यात उतरले आहेत.
कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ म्हणजे नेत्यांच्या आर्थिक सत्तेचे केंद्र असल्याचे म्हटले जाते. 5000 कोटींची उलाढाल आणि 16 हजारहुन अधिक दूध संस्था आलेल्या तसेच रोज 13 लाख लिटर दुध विक्री करणाऱ्या गोकुळ दूध संघावर आता राज्यातल्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीच्या ताब्यात दूध संघ घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे त्यांच्या हाताला लागले असून त्यांनी सत्ताधारी सतेज पाटलांच्या विरोधात थेट बंड केले आहे.
advertisement
सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीत एकत्र असताना निवडणुकीत महाडिकांच्या कडून गोकुळ काढून घेत त्यावर ताबा मिळवला. 25 वर्षाहून अधिक काळाची सत्ता गेल्याने महाडिक कुटुंबियांना याचा चांगलाच फटका बसला. आर्थिक केंद्र हातात असल्याने आणि गावपातळीपर्यंतचे राजकारण गोकुळमुळे हातात ठेवता येत असल्याने राजकीय नेत्यांना गोकुळ फायदेशीर ठरते. हेच ओळखून सतेज पाटलांनी महाडीकाना सत्तेवरून पाय उतार केले. त्यानंतर धनंजय महाडिक खासदार झाल्याने आणि राज्यात महायुतीची सत्ता आल्याने महाडिक कुटुंबीयांनी पुन्हा गोकुळ ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यातून गोकुळची चौकशीही लागली. मात्र आता थेट अध्यक्षच हाताला लागल्याने महाडिकांनी हालचाली वेगवान केल्या आहेत.
सतेज पाटलांचे डॅमेज कंट्रोल सुरू
सध्या गोकुळ मध्ये सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची राजर्षी शाहू शेतकरी आघाडी सत्तेत आहे. त्यांच्याकडे अध्यक्षांना धरून 18 संचालक आहेत. तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीकडे तीन संचालक आहेत. मात्र पक्षीय विचार करता महायुतीकडे 10 महाविकास आघाडीकडे 8, हसन मुश्रीफ यांच्याकडे 3 संचालक आहेत. त्यामुळे महायुतीचे पारडे सध्या जड आहे. मात्र अध्यक्षांच्या बंडानंतर सतेज पाटील यांनी डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. आघाडीचे अध्यक्ष वगळता सर्व संचालक एकत्र असल्याचे आज सगळ्यांना एकत्र करून दाखवून दिले आहे.
मुश्रीफ ठरणार किंग मेकर...
दरम्यान सत्ता स्थापन करायची असेल तर महायुतीला 14 संचालक एकत्र करावे लागणार आहेत. मुश्रीफ याना सोबत घेतले तर हा आकडा पूर्ण होऊ शकतो. मात्र मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात सहकारी संस्थांत दोस्ताना आहे. त्यामुळे मुश्रीफ सतेज पाटील यांची साथ सोडण्याची शक्यता कमी आहे. मात्र जर वरून दबाव आला तर मुश्रीफ यांना आपला मुलगा नाविद याचे नाव पुढे करून त्याला अध्यक्ष करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुश्रीफ ही खेळी करणार की अजून एक वर्ष कालावधी निवडणुकीला असल्याने अध्यक्षांचे बंड पेल्यातले वादळ ठरणार हेच पाहणे आता महत्वाचे असणार आहे.