कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सोन्यातील कस्टम ड्युटी कमी केल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर सर्वत्र सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यभरात सोन्या-चांदीचे दर स्वस्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. कोल्हापुरात सोन्या-चांदीचे हे दर किती उतरले आहेत, याचा नागरिकांना आणि गुंतवणूकदारांना कसा फायदा होणार आहे, याबाबत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी माहिती दिली आहे.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सराफ बाजारपेठेसाठी चांगला असा हा यावर्षी केंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प आहे. गेल्या जवळजवळ 8 ते 10 वर्षांचा विचार करता, हा अतिशय चांगला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सोन्यावर आणि चांदीवर कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा करण्यात आली. जवळपास 15 टक्के कस्टम ड्युटी ही तब्बल 9 टक्के कमी करून फक्त 6 टक्के झाली आहे.
सोन्यामध्ये पण 6 टक्के कस्टम ड्युटी सध्या आहे. त्याच बरोबर चांदी आणि प्लॅटिनमसाठी देखील 6 ते 6.5 टक्क्यांच्या आसपास आहे. याचा चांगला परिणाम सराफ बाजारावर दिसून येत आहे, असे भरत ओसवाल यांनी सांगितले आहे.
किती झाला आहे परिणाम?
सोन्या चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे दागिन्यांच्या दरामध्ये बराचसा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जवळजवळ 5 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीदेखील जवळजवळ 7 हजार रुपयांनी कमी झाली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्या-चांदीचे दर पाहिले तर कोल्हापुरात 73,500 रुपयांच्या आसपास होता. मात्र, सध्या तोच दर 68,500 रुपयांपर्यंत आलेला आहे. यावरून जवळपास चार ते पाच हजार रुपये सोन्याचा दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच चांदीचा दर देखील किलोमागे 92 हजार ते 93 हजार रुपयांच्या आसपास होता. पण सध्या 86,000 रुपयांपर्यंत दर कमी झालेला आहे. त्यामुळे सोने-चांदी दोन्ही मध्ये दर चांगलाच कमी झालेला आहे, असे देखील भरत ओसवाल यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थसंकल्पातील ती घोषणा अन् सोन्याचे दर उतरले, छत्रपती संभाजीनगरमध्ये आता काय भाव?
सर्वसामान्यांना होणार फायदा -
सोन्याचे दर 75 हजार रुपयांपर्यंत वाढले होते. मात्र, आता हे दर खूपच उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांसाठी किंवा गुंतवणूकदारासाठी आताचा काळ हा खूप चांगला आहे. जेणेकरून सोन्या-चांदीचा दर कमी झाल्याने गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खरेदी करता येणार आहे. पुढे येणारे सण, लग्नसराई यांच्या अनुषंगाने गुंतवणूक करून ठेवायला सराफ बाजारात खूप चांगली परिस्थिती आहे. त्याचा ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन भरत ओसवाल यांनी केले आहे.
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईमध्ये दरात प्रचंड घट, नवे दर पाहून बसणार नाही विश्वास
कोल्हापुरातील आजचे सोने-चांदीचे दर -
सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) (जीएसटी वगळून)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 69,400/-
10 ग्रॅम 22 कॅरेट - 63,840/-
10 ग्रॅम 18 कॅरेट - 54,130/-
सोन्याचे दर ( प्रति 1 ग्रॅम) (जीएसटी सह)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,940/-
1 ग्रॅम 22 कॅरेट - 6,384/-
1 ग्रॅम 18 कॅरेट - 5,413/-
चांदिचे दर (जीएसटी वगळून)
प्रति किलो - 85,400/-





