कोल्हापूर : वडिलांचे छत्र लहानपणीच हरपलेले, त्यात आई अंगणवाडी सेविका. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच. मात्र, तरीही तरुणाने परिस्थिती समोर हार न मानता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर, प्रचंड कष्ट, जिद्द आणि चिकाटीने प्रामाणिकपणे अभ्यास करत मोठे यश मिळवले आहे. 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा परीक्षेत या तरुणाने घवघवीत यश संपादन केले आहे. आज जाणून घेऊयात, या तरुणाची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
तन्मय मांढरेकर असे या तरुणाचे नाव आहे. नुकताच राज्यसेवा आयोगाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये तन्मय राज्यात दहावा तर ओबीसी प्रवर्गातून राज्यात चौथा आला आहे. आपल्या मेहनतीने त्याने आपल्या उराशी बाळगलेले मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याच्या या यशानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेला हजारो- लाखो विद्यार्थी बसतात. 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा आयोग्याच्या परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवले आहे. दुसऱ्याच प्रयत्नात तन्मयने राज्यात दहावा क्रमांक आणि ओबीसी प्रवर्गातून चौथा क्रमांक मिळवला आहे. तन्मय हा मूळचा इचलकरंजी येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. तर त्याची आई अंगणवाडी सेविका आहे. त्यामुळे परिस्थिती तशी बेताचीच होती.
तो त्याची आई, आजी आणि बहिणीसह एका छोट्या घरात भोनेमाळ परिसरात राहतो. या छोट्या घरात तन्मयने मोठे काहीतरी करायचे स्वप्न बघितले. काहीतरी मोठे करायचं हे उराशी बाळगून बसलेल्या आपल्या पोरांचा संभाळ आईने अगदी प्रामाणिकपणे केला. आपल्या दोन्ही मुलांनी लख्ख यश मिळावावे, हे त्यांचे स्वप्न होते. कितीही कष्ट करायला लागू देत पण आपल्या पोरांच्या प्रामाणिक कष्टाचे चीज व्हावे, असे आईला वाटत होते. हीच भावना उराशी बाळगून अगदी जिद्दीन चिकाटीने प्रामाणिक प्रयत्न करत राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासाला अगदी जोमाने सुरुवात केली आणि 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत तो राज्यात दहावा आला.
असा आहे तन्मयचा शैक्षणिक प्रवास -
तन्मयचे प्राथमिक शिक्षण जया आदिनाव चौगुले प्राथमिक विद्यामंदिरात तर माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. व्यंकटेश महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला बारावीच्या सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाले. या आधारेच त्याला पुण्यातील सीजीईपी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तन्मयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. यामुळे तो परिस्थिती समोर हार न मानता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभियांत्रिकीच्या पदवीच्या शिक्षणात अत्यंत चांगल्या गुणांने उत्तीर्ण झाला.
यामुळे त्याला सहजपणे चांगल्या कंपनीची नोकरीची संधी होती. मात्र, राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून सनदी अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळेच त्याने राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. स्वतःच अभ्यास करत त्याने नोट्स काढले. कोणत्याही क्लासचा फारसा आधार न घेता दररोज 12 ते 14 तास तन्मय अभ्यास करत होता. राज्यसेवा परीक्षेत चांगले यश मिळवायचेच हे त्याचे ध्येय होते आणि त्याचे हे ध्येय साध्य झाले.
नुकत्याच राज्यसेवा परीक्षा मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निकालात तो सर्वसाधारण गुणवत्ता वर्गात राज्यात दहावा तर ओबीसी प्रवर्गात राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या निकालाने तन्मयचे क्लास वन ऑफिसर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याच्या या यशानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.