नेमकं काय घडलं?
एसटी महामंडळाची ही हिरकणी बस सकाळी ८ वाजता प्रवाशांना घेऊन आजऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. प्रवास सुरळीत सुरू असताना, तांदूळवाडी गावाजवळ अचानक बसचा टायर मोठ्या आवाजासह फुटला. टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन जोरात धडकली. बस डिव्हायडरवर चढल्याने प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा आणि घबराट निर्माण झाली.
advertisement
एका महिला प्रवाशाला दुखापत, बाकी सुरक्षित
या अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण २१ प्रवासी प्रवास करत होते. धडक इतकी जोरात होती की बसमधील सामानाची फेकाफेक झाली. या धक्क्यामुळे एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे, मात्र इतर २० प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि प्रवाशांना बसबाहेर काढण्यास मदत केली.
नशिब बलवत्तर म्हणून...
हायवेवर वाहनांचा वेग प्रचंड असतो, अशा वेळी टायर फुटून बस पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने बस डिव्हायडरवर अडकल्याने मोठा उलटफेर टळला. सध्या या अपघातामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्रवाशांना दुसऱ्या बसने त्यांच्या इच्छित स्थळी रवाना करण्यात आले आहे. पण या घटनेने हायवेवरील एसटीच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
