TRENDING:

कोपरगाव विधानसभा निवडणूक 2024: कोपरगावात शरद पवारांचा ‘निलेश लंके पॅटर्न’ चालणार? विद्यमान आमदारासमोर उभा राहिला त्यांचाच खंदा कार्यकर्ता

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024, Kopargaon Assembly Constituency:कोपरगाव मतदारसंघात काळे आणि कोल्हे ही राजकीय घराणी एकमेकांविरोधात निवडणूक लढतात. हा इतिहास आहे. पण या वेळी अजित पवार महायुतीत सामील झाल्याने पहिल्यांदाच दोन्ही घराणी महायुतीचा भाग असल्याने उमेदवारीवरून पेच निर्माण झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर : महाराष्ट्राचं राजकारण गेल्या चार वर्षांत 360 अंशांनी बदललं आहे. गेल्या निवडणुकीत ज्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोध केला त्यांच्याच विरोधात अनेक नेते आणि कार्यकर्ते उभे आहेत. सहा पक्ष आणि दोन आघाड्या एकमेकांविरोधात उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आणि पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांची  या फुटीमुळे कशी कोंडी झाली आहे याचं उदाहरण म्हणजे नगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघ. आशुतोष काळे तिथले विद्यमान आमदार आहेत. ते अजित पवार यांच्याबरोबर आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचाच कार्यकर्ता संदीप वर्पे उभे आहेत.
Kopargaon Assembly Constituency-
Kopargaon Assembly Constituency-
advertisement

कोपरगाव मतदारसंघात काळे आणि कोल्हे ही राजकीय घराणी एकमेकांविरोधात निवडणूक लढतात. हा इतिहास आहे. पण या वेळी अजित पवार महायुतीत सामील झाल्याने पहिल्यांदाच दोन्ही घराणी महायुतीचा भाग असल्याने उमेदवारीवरून पेच निर्माण झाला. महायुतीकडून अखेर अजित पवारांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने संदीप वर्पे यांना उभं केलं आहे. संदीप वर्पे हे मागच्या निवडणुकीत काळे यांचेच कट्टर समर्थक आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. आता मात्र चित्र पालटलं आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीची ही लढाई कोपरगावात कोण जिंकणार याविषयी उत्सुकता आहे.

advertisement

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ इतिहास

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोपरगाव मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुका आणि राहता तालुक्यातील पुणतांबा आणि चितळी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. कोपरगाव हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ 1999 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर मात्र मतदारांनी कुठल्या एका पक्षाला सलगपणे कौल दिलेला नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर कोपरगावचे तत्कालीन आमदार शंकरराव कोल्हे राष्ट्रवादीत आले. ते पाच वेळा कोपरगावातून निवडून आले होते. 2004 मध्ये अशोकराव काळे यांनी शिवसेनेसाठी हा मतदारसंघ खेचून घेतला. 2009 मध्येही कोपरगाव सेनेकडेच राहिलं. 2014 मध्ये स्नेहलता कोल्हे यांनी भाजपच्या तिकिटावर लढताना काळे यांचा मुलगा आशुतोष काळे यांना हरवलं आणि त्या आमदार झाल्या. 2019 मध्ये पुन्हा एकदा स्नेहलता कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे सामना झाला. पण यावेळी काळे राष्ट्रवादीत होते. त्यांनी कोल्हेंचा पराभव करत आमदारकी मिळवली.

advertisement

2019 विधानसभा निकाल कोपरगाव

आशुतोष काळे – राष्ट्रवादी – 87,566

स्नेहलता कोल्हे – भाजप - 86,744

काळे – कोल्हे असा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 2019 ला सामना झाला. केवळ 1622 मतांनी काळे यांनी स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आल्यानंतर भाजपातील राजकीय परिवाराची राजकीय कोंडी झाली. काळे आणि कोल्हे ही पारंपारिक लढाई होणार नाही.  पण काही काळ यांच्यामुळे महायुतीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला होता. भाजप नेते विवेक कोल्हे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने महायुतीत जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. अखेर कोल्हे कुटुंबीयांनी निवडणूक माघार घेतल्याने अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचा मार्ग मोकळा झाला.

advertisement

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून कोल्हे परिवाराने माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिलीय. आमदार आशुतोष काळे विरोधात संदीप वर्पे मैदानात उतरले आहेत. मागील निवडणुकीत काळेंचा प्रचार करणारा कार्यकर्ता आता विरोधात लढणार आहे.

संदीप वर्पे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा शरद पवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एक निलेश लंके सापडला, अशी चर्चा आता कोपरगाव मतदारसंघात रंगताना दिसत आहे.

advertisement

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी ही लढत पाहायला मिळणार आहे.

लोकसभा 2024 ला काय झालं?

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो. शिर्डीत 2024 लोकसभा निवडणुकीला सेना विरुद्ध सेना असा थेट सामना झाला होता. भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेना उबाठा पक्षातर्फे तिकिट मिळालं होतं. तर माजी खासदार सदाशिव लोखंडे शिंदेंच्या गोटात होतं. महायुतीने शिवसेनेतर्फे त्यांनाच पुन्हा तिकिट दिलं होतं. सदाशिव लोखंडे 2014 आणि 2019 दोन्ही निवडणुका शिवसेनेतर्फे जिंकल्या होत्या. पण एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यावर लोखंडे यांनी शिंदेंना साथ दिली होती. या लोखंडेंचा 4000 मतांनी शिर्डीतून पराभव झाला.

अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचं सध्याचं बलाबल

राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत.

  1. अकोले - किरण लहामटे (राष्ट्रवादी)
  2. संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
  3. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
  4. कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
  5. श्रीरामपूर - लहू कानडे (काँग्रेस)
  6. नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष) आता शिवसेना (उबाठा)
  7. शेवगाव पाथर्डी - मोनिका राजळे (भाजप)
  8. राहुरी - प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
  9. पारनेर - निलेश लंके (राष्ट्रवादी) सध्या रिक्त
  10. अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
  11. श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
  12. कर्जत जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी)
  13. टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
    सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोपरगाव विधानसभा निवडणूक 2024: कोपरगावात शरद पवारांचा ‘निलेश लंके पॅटर्न’ चालणार? विद्यमान आमदारासमोर उभा राहिला त्यांचाच खंदा कार्यकर्ता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल